जागतिक महिलादिनी ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा’ उपक्रम

मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपचे आयोजन, तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल

बहुगुणी डेस्क, मारेगाव: 8 मार्चला सर्वत्र जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. याच पर्वावर येथील मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपने सलग 3 दिवस ‘सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा’ हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत दिनांक 8, 9 व 10 मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात दुपारी 2 वाजता प्रसिद्धीच्या प्रवाहात नसलेल्या; परंतु भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येईल. कर्तुत्वान नोंदणीकृत महिलांचा साडीचोळी प्रदान करण्यात येईल.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संतोष कुंडकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जिनिंग मारेगावचे संचालक गजानन खापने, माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 9 मार्चला सायंकाळी 4 वाजता स्त्री सन्मान शोभायात्रा निघेल. ही शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून शहरात मार्गक्रमण करीत परत येईल. शोभायात्रेत विविध राज्यांची लोकनृत्ये आणि देखावे सादर केले जातील. या महिला सांस्कृतिक  रॅली चे उद्घाटन किरण संजय देरकर करतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इजहार शेख, संध्या पोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा हे उपस्थित राहतील. रविवार दिनांक 10 मार्चला सायंकाळी 5 वाजता 30 वर्षांवरील महिलांकरिता नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत जिनिंगच्या पटांगणात ही नृत्य सपर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अशी होईल. या नृत्यस्पर्धांचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ स्वामी पतसंस्था वणीचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को. सोसायटी ली. वणीचे अध्यक्ष संजय खाडे, वसंत जिनिंग मारेगावचे संचालक रवी धानोरकर, शामा तोटावार, माजी नगराध्यक्ष मनीष मसकी, वणी न्यूज एक्स्प्रेसचे संपादक  डॉ. विनोदकुमार आदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समूह नृत्याला प्रथम पारितोषिक 11,000 रू., द्वितीय पारितोषिक 7,000 रू. तर तृतीय पारितोषिक  5,000 रू. राहील. एकल नृत्याला प्रथम पारितोषिक 7,000 रू., द्वितीय पारितोषिक  5,000 रू. तर तृतीय पारितोषिक 3,000 रू. आणि चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समूह नृत्यासाठी 500 रू. तर एकल नृत्यासाठी 200 रू. प्रवेश फी राहील. प्रवेशासाठी प्रतिभा डाखरे (9922669648), बीना दुपारे हेपट (9356035463), मयूरी जैस्वाल (7066006684) यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती  मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जुनेजा यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उदय रायपुरे, गजानन जैस्वाल, शहाबुद्दीन अजानी, दुष्यंत जैस्वाल आदी सदस्य परिश्रम घेत आहे.

Comments are closed.