पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

पती व भावजयीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: 19 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने बसस्थानक परिसरात विष घेतले होते. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच रात्री या महिलेची ओळख पटली व मृतकाचे नाव रिता निलेश असुटकर (44) ही रा. हिवरा मजरा तालुका मारेगाव येथील रहिवासी असून ती काही काळापासून आपल्या माहेरी पठारपुर ता. झरी येथे राहत होती. या प्रकरणी रिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती नीलेश रामचंद्र असुटकर (48) रा. हिवरा मजरा व भावजय प्रिया सुशांत नांदेकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतका रिता हिचे अंदाजे 20 वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील नीलेश आसुटकर सोबत लग्न झाले होते. तिला एक 18 वर्षाचा मुलगा आणि एक 16 वर्षाची मुलगी आहे. मात्र काही काळापासून तिच्या पतीचे नात्यातीलच एक महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. हे उघड झाल्यानंतर त्यावरून पती पत्नीच्या दरम्यान वाद व्हायचे. त्यामुळे गेल्या एका वर्षापासून रिता आपल्या माहेरी आईवडिलांकडे पठारपूर येथे राहायला आली होती. शिवाय दोघांनी घटस्फोटसाठी न्यायालयात अर्ज केलेले होते.

रिताचा मुलगा आणि मुलगी दोघेही वणी येथे शिक्षण घेतात. गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी रिता वणीला मुलांना भेटायला जात असल्याचे सांगून घरून निघून गेली होती. दुपारी वणी बस स्थानकात रिताने कीटकनाशक प्राशन केले. बसस्थानकातील काही लोकांना ही बाब कळताच तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अनोळखी महिलेने विश प्राशन केल्याच्या बातम्या मिडीयात व्हायरल झाल्यानंतर मृतकाचे वडील विठ्ठल नांदेकर रा. पठारपूर ता.झरी यांना संशय आला. त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठून याबाबत खात्री केली व ते वणी पोलीस स्टेशनला पोहचले. मृतका ही त्यांची विवाहित मुलगी रिता निलेश आसुटकर असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

वडिलांच्या तक्रारीनुसार रिताच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने तिला घरून हाकलले होते. तेव्हापासून ती नैराश्यात होती. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप रिताच्या वडिलांनी केला. त्यानुसार रिताचा पती व तिची भावजय यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

Comments are closed.