पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा
अडेगाव येथील रहिवाशांचे गटविकास अधिका-यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी स्थानिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. अडेगाव येथे 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या मोठी असूनही गावातील पांदण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याने साधी बैलगाडी व दुचाकी जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावात त्वरित पांदण रस्ते तयार करावे अशी मागणी अडेगाव वासियांकडून करण्यात आली आहे.
अडेगाव येथील माया चिकटे यांच्या शेतापासून ते संभाजी पारखी यांच्या शेतापर्यंत (मुकुटबन), मोहन पानघाटे (शिवधुरा) यांच्या शेतापासून लटारी दातारकर यांच्या शेतापर्यंत (पिंपरड रोड), धनंजय पाचभाई (आमलोन रोड) यांच्या शेतापासून ते नामदेव पानघाटे यांच्या शेतापर्यंत (शिवधुरा), गजानन धानोरकर यांचे शेतापासून नामदेव लोढे यांच्या शेतापर्यंत व रामदास आसुटकर यांच्या शेतापासून अरुण काटकर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर रस्त्याच्या कामाकरिता ग्रामपंचायतीमध्ये 17 नोव्हेंबर रोजी मासिक सभेत प्रशासक चंदा रामराव गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली सचिव प्रांजली वाढई यांच्या उपस्थितीत सभा झाली. यात पालकमंत्री योजने अंतर्गत पांदण रस्त्याचे गट अ, गट ब, व गट क अशा प्रकारामध्ये बांधकाम करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सन 2020-21 च्या तालुका कृती आराखड्यात या रस्त्यांचा समावेश करण्यात यावा असाही प्रस्ताव ठेवण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमाल व वाहतुकीकरीता रस्ता आवश्यक असल्याची नोंदही करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे प्रस्तावित सर्व रस्त्यांचे काम ग्रामपंचायतीने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गावक-यांतर्फे करण्यात आली. निवेदनावर डॉ मारोती मासिरकर, अभय पानघाटे, दिलीप उरकुडे, राहुल निखाडे, भगवान पानघाटे, प्रवीण मासिरकर, विठ्ठल ठेंगणे, शंकर गडकर, अशोक ठाकरे, अस्थीक चिंचोळकर, संतोष ठाकरे, पुंडलिक ठाकरे व संतोष सहस्त्रबुद्धे यांची सही आहे.
हे पण वाचा:
हे पण वाचा: