येदलापूर येथील वॉलकम्पाउंड प्रकरणी कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
ठेकेदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी, ग्रामपंचायतच सदस्याचे निवेदन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडला 15 दिवसातच भेगा पडल्या होत्या. याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आता ग्रामपंचायत सदस्य दयाकर गेडाम यांनी उपोषणाचा इशारा देत संबंधीत ठेकेदारावर व अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सहा महिन्याआधी खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम करण्यात आले होते. या बांधकामात रेती ऐवजी काळ्या चुरीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान 15 दिवसातच वॉलकम्पाउंडवर चारही दिशेने मोठं मोठ्या भेगा पडल्या. बांधकामासाठी वापरण्यात आलेले 12 लाख 76 हजार रुपये पाण्यात गेल्याचा आरोप करत आधीही तक्रारही करण्यात आली होती परंतु सदर ठेकेदाराने प्लास्टिक पेंटचा वापर करून रातोरात भिंतीवरील सर्व भेगा बुजविल्या होत्या.
वॉलकंपाउंडचे काम करणारा हा राजकीय ठेकेदार असल्यामुळे वॉलकंपाउंड बांधकाम करताना संमधीत अभियंता यांनी कामाची पाहणी किंवा तपासणी केली की नाही? की दबाव व लालसेपोटी निकृष्ट बांधकाम करण्यास मुभा दिली असा प्रश्न गेडाम यांनी उपस्थित केला आहे.
सदर कामाची योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणतेही देयके काढण्यात येऊ नये तसेच ठेकेदाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी व अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावी अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी केली आहे. तसेच त्वरित कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे देखील वाचा:
विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक