लोखंडी रॉडने दोघांना मारहाण, एक गंभीर

दारू विक्रीविरोधामुळे मारहाण केल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: वादातून दोन जणांना मारहाण केल्याची घटना वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या येणक येथे घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर आहे. ही घटना काल शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

अनुसया येल्लावार (40) आणि नुसी येल्लावार (45) हे दाम्पत्य येणक येथे राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला ताडपेल्लीवार यांचे घर आहे. ताडपेल्लीवार यांच्या घरातील स्लॅबवरील पाणी येल्लावार यांच्या घरात शिरल्याने भांडणास सुरूवात झाली. ताडपेल्लीवार यांचे मुले किसना (25) आणि रमण (25) यांनी अनुसया व नुसी यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला. त्यामध्ये अनुसया यांच्या डोक्याला सहा टाके पडले व नुसी यांच्या डोक्याला तीन टाके पडले. अनुसया आणि नुसा यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अनुसया यांना चंद्रपूरला रेफर होण्यास सांगण्यात आले आहे.

ताडपेल्लीवार हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात. 15 दिवसांआधी येणक येथील रहिवाशांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करावी या मागणीसाठी शिरपूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते. मात्र अद्यापही ही अवैध दारूविक्री बंद झालेली नाही. अवैध दारूविक्रीविरोधात आवाज उठवल्याने त्याचा राग काढून मारहाण केली असल्याचा आरोप येल्लावार यांनी केला आहे.

अद्याप गुन्हा दाखल का नाही?
या घटनेत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले नाही. अवैध दारूविक्रेत्याविरोधात येणक वासियांनी निवेदन दिले होते. मात्र त्यांच्यावरही शिरपूर पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणतीही कारवाई
करण्यात आलेली नाही. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांच्या डोक्यावर शिरपूर पोलिसांचा हात तर नाही ना अशी शंका सर्वसामान्य उपस्थित करीत आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस जमादार अक्कलवार हे करीत असून सरपंच तातोबा बोंडे आणि पोलीस पाटील संतोष सोनटक्के हे काय भूमिका घेतात यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.