वागदरा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आज दुपारच्या सुमारची घटना

विवेक तोटेवार, वणी: जुना वागदरा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रतीक किशोर पावडे (21) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की किशोर मुरलीधर पावडे हे आपल्या दोन मुलांसह वागदरा येथे राहतात. ते ठेक्याने शेती व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामात त्यांचे मुलं देखील मदत करतात. मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ते त्यांचा लहान मुलगा प्रतीक हे शेतात कामाकरिता गेले होते. दुपारी जेवणाकरिता ते घरी आले. यावेळी दोघांनीही सोबत जेवण केले. तब्बेत बारी वाटत नसल्याचे सांगून प्रतीक हा घरीच थांबला तर वडील हे जेवण आटोपून पुन्हा शेतात गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी घरी कुणीच नव्हते, तर त्याची आई देखील शेतात गेली होती. दरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधून प्रतीकने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर प्रतीकचा मोठा भाऊ वैभव हा जेवण करण्याकरिता घरी आला. त्यावेळी दाराची कडी आतून लावलेली होती. दार ठोकल्यानंतरही आतून काहीही प्रतिसाद आला नाही.

शेवटी वैभवने हा सर्व प्रकार आपल्या काकाला फोन करून सांगितला व तेथून निघून गेला. 3 वाजता वैभव हा घरी आला व त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता भाऊ प्रतीक हा घरातील खोलीत गळफास घेऊन आढळून आला. त्याने वडिलांना फोन करून माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रतीकच्या या पावलामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.