मोहदा येथे क्रशर प्लांटवर करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू
उघड्यावर पडलेल्या इलेक्ट्रिक तारांचा स्पर्श होऊन दुर्घटना
जितेंद्र कोठारी, वणी: खाणीमध्ये ब्लास्टिंग करणाऱ्या एजन्सीकडे काम करणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील मोहदा (वेळाबाई) येथील विदर्भ प्रोजेक्ट प्रा. लि.च्या क्रशर प्लांटवर ही घटना सोमवार दुपारी 2 वाजता दरम्यान उघडकीस आली. महाकाली विठ्ठल भोसकर (27) रा. मोहदा असे मृत युवकाचे नाव आहे. क्रशर प्लांट परिसरात जमिनीवर उघड्या पडलेल्या इलेक्ट्रिकच्या तारेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मोहदा (वेळाबाई) येथे चंद्रपूर येथील इस्माईल झवेरी यांच्या मालकीची विदर्भ प्रोजेक्ट प्रा.लि. या नावाने दगडाची खाण आणि क्रशर प्लांट आहे. दगड खाणीमध्ये ब्लास्टिंगचे काम चंद्रपूर येथीलच हर्षल कहाळे यांची कहाळे ड्रीलिंग कम्पनीला देण्यात आले आहे. मृतक महाकाली भोस्कर हा कहाळे यांच्याकडे कामावर होता.
सोमवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता झवेरी यांच्या खाणीत ब्लास्टिंग करण्यात आली. दरम्यान क्रशर प्लांट परिसरात उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारेवर महाकाली भोसकर याचा पाय पडला. त्यामुळे त्याचा जबर शॉक लागून तो जागेवरच मरण पावला.
घटनेची माहिती क्रशर प्लान्टवर काम करणाऱ्या व ब्लास्टिंग एजन्सीच्या कामगारांना कळताच त्यांनी याबाबत तात्काळ झवेरी आणि कहाळे यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान महाकाली भोसकर यांच्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना घटनेबाबत सुगावा न लागू देता त्यांनी मृतदेह एका वाहनात टाकून परस्पर चंद्रपूर येथे एका खासगी दवाखान्यात नेला.
डॉक्टरांनी महाकालीला मृत घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली. विदर्भ प्रोजेक्ट प्रा.लि. च्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप करीत मृतक महाकाली यांच्या आई व भावाने मोबदला मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता. अखेर कंपनीने आर्थिक मदत दिल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.
घडलेल्या घटनेबाबत शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मात्र कुटुंबियांकडून अद्याप पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती आहे. मृतक महाकाली यांच्या मागे आई व लहान भाऊ आहे.
हे देखील वाचा:
मयूर मार्केटिंगमध्ये ‘बाप्पा मोरया’ ऑफरला सुरूवात… खरेदीवर जम्बो डिस्काउंट
Comments are closed.