प्रकाशात उजळून निघालीत घरे, रस्ते आणि अंतःकरणे…..

डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून अत्यंत दुर्गम आदिवासी पोडावर सौर दिव्यांचा लखलखाट

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जग फोर जी, फाईव्ह जीच्या गोष्टी करीत आहेत. मंगळच नव्हे तर सूर्यावरदेखील अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार म्हणतंय की जवळपास घरोघरी वीज पोहचली आहे. सर्व बाबींवर कृत्रिम प्रकाशझोत टाकून आपलीच प्रतिमा उज्ज्वल करण्याचे हरेक प्रकार सुरू आहेत. मात्र एक गाव असं होतं, की ज्या गावाने रात्रीला कधीच उजेड पाहिला नव्हता. घासलेट, खाण्याच्या तेलाच्या दिव्यांनी त्यांच्या झोपड्यांचे अंधारे कोपरे टिमटिमायचे कधी. पण एक डॉक्टर प्रकाशदूत म्हणून आला. त्याने अशी काही जादू केली, की त्या कितीतरी झोपड्या, गावातले अंधारलेले रस्ते आणि सर्वांचे चेहरे लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले.

घरात व गावात लाईट लागल्याचा आनंद साजरा करताना

सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदिवासी मित्र डॉ.महेंद्र लोढा हे त्या प्रकाशदुताचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल मारेगाव तालुका. याच तालुक्यातील घोगुलदरा ग्रामपंचायतीमधील काही घरांची वस्ती असलेले आदिवासींचे दुबाटी पोड. डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून त्यांनी सौरदिव्यांची व्यवस्था घरोघरी व प्रत्येक मार्गावर केली.

सोलर लाईटच्या कार्यात डॉ. लोढांचा प्रत्यक्ष सहभाग

आदिवासीमित्र पुरस्काराने सन्मानित डॉ. महेंद्र लोढा अनेक वर्षांपासून वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या आदिवसीबहुल क्षेत्रात कार्य करीत आहेत. याआधीदेखील अनेक ठिकाणी त्यांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक सुविधा दुर्गम भागांसाठी उपलब्ध करून दिल्यात. त्यांना कुठे समस्या दिसली किंवा कळली तरी ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातात. मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा ग्रामपंचायत अंतर्गत हे दुबाटी पोड येतं. पोड म्हणजे आदिवसी समुदायाची वस्ती. मोजक्या काही घरांची ही वस्ती असते. दुबाटी पोड हे डोंगर-दऱ्यात वसलेलं आहे. तिथे जाण्या-येण्याच्या विशेष सुविधा नाहीत. शहराच्या ते अधूनमधूनच संपर्कात येतात. जे काही त्यांचं विश्व आहे, ते याच ठिकाणी आहे.

डॉ. लोढा हे स्त्रि-रोग व प्रसुतीतज्ज्ञ आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिषेक गौरकार यांना अपत्यप्राप्ती झाली. त्यांनी ही फीज स्वतः न घेता, डॉ. गौरकार यांना सदर आदिवासी पोडाच्या कार्यासाठी खर्च करण्याची प्रेरणा दिली. अपत्यप्राप्तीचा आणि अशा कृतज्ञतेचा डॉ. गौरकार यांनाही आनंद झाला. डॉ. लोढा यांनी पुढाकार घेतला. बेंगलोरहून सर्वोत्तम क्वॉलिटीचे सौरदिवे त्यांनी मागविलेत. पोडातील रस्त्यांवर लाईट बसविलेत. पोडातील प्रत्येक घरात त्यांनी सोलर लाईट लावलेत. रात्र झाल्यानंतर कधीच एवढा लख्ख उजेड न पाहिलेला हा पोड प्रकाशात न्हाऊन निघत होता.

घोगुलदरा ग्रामपंचायतीमधील आदिवासींचे दुबाटी पोड.

केवळ रस्तेच नव्हे, केवळ घरच नव्हे तर ही प्रकाशाची चमक त्या वस्तीत राहणाऱ्यांच्या डोळ्यांतून दिसत होती. आयुष्यात कधीच असा प्रकाश न पाहिलेली ही माणसं आता अंतःकरणातूनदेखील उजळली होती. मनातून डॉ. महेंद्र लोढा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सगळं काही प्रज्वलित झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी असा प्रकाश पाहिला होता. डॉ. महेंद्र लोढा यांच्या रूपात त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकाशदूत पाहिला होता. समाधानाने आणि कृतज्ञतेने सगळं गाव उजळलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.