भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका, नरसाळा आणि दांडगाव नंतर आज पुन्हा शिवणी (धोबे) येथे एका शेतक-याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हरिदास सूर्यभान टोणपे, वय अंदाजे 47 असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. आज मंगळवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांआधी आलेल्या पुरामध्ये हरिदास यांचे शेत पुराच्या पाण्यात खरडून गेले होते. त्यामुळे ते निराश होते अशी माहिती मिळत आहे.
हरिदास सूर्यभान टोणपे यांच्या नावाने शिवणी (धोबे) येथे 5 एकर शेती आहे. आज सकाळी त्यांच्या घरातील सर्व मंडळी शेतात कामासाठी गेले होते. 9 ते 10 च्या सुमारास घरी कुणीही नसल्याची संधी साधून हरिदास यांनी मोनोसील हे कीटकनाशक प्राशन केलेल. दुपारी त्यांच्या घरातील कुटुंबीय शेतामधून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी प्राशन केलेल्या कीटकनाशकाचे प्रमाण एवढे जास्त होते की घरची मंडळी येण्यापूर्वीच हरिदासचा मृत्यू झाला होता. वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता.
सतत तीन वर्षे पडलेला दुष्काळ यामुळे हरिदास हे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेले होते. यावर्षी शिवणी गावाला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. त्यामुळे त्यांच्या शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानातून हरिदास यांना स्वतःला सावरता आले नाही. आपल्या डोळ्यासमोर अतिवृष्टीने झालेले शेतीचे नुकसान पाहून हरिदासचे मन गहिवरून यायचे. त्याच मनस्थितीतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतल्याचीही माहिती आहे.
सतत आत्महत्यानी मारेगाव तालुका हादरून गेलेला आहे. गेल्या पाच दिवसातील ही चौथी आत्महत्या आहे. या घटनांना आळा बसणे आवश्यक असताना उलट त्या वाढताना दिसत आहे. हरिदासच्या पश्चात त्यांची म्हातारी आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
सततच्या आत्महत्या कधी थांबणार?
मारेगाव तालुक्याची ओळख आता आत्महत्येचा तालुका अशी होत आहे. दर आठवड्यात 4-5 आत्महत्येच्या घटना तालुक्यात घडत आहे. ऐन सणावारांमध्ये देखील आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहे. मात्र अद्यापही प्रशासकीय स्तरावर या तालुक्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी आता यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.