लोकसेवेचा वारसा लाभलेले डॉ. श्याम विजय जाधव (नाईक)

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे सर्वसामान्यांचे डॉक्टर

0

आजोबा सोनबाजी नाईक यांच्याकडून लोकसेवा आणि समाजक्रांतीची प्रेरणा मिळाली. आपल्या समाजासोबत सर्वच रंजल्या-गांजल्यांसाठी आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. शिक्षण हे त्यावरचं सर्वात मोठं साधन आहे, याची त्यांनी जाणीव होती. अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. ते डॉक्टर झाले. आता डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) अशी एक नवी ओळख त्यांना मिळाली.

आजोबा सोनबाजी जाधव (नाईक) हे सामाजिक चळवळीत अत्यंत सक्रीय होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासमवेत त्यांनी धडाडीने काम केलं. बंजारा समाजाच्या उत्कर्षाकरिता त्यांनी विविध पातळ्यांवर काम केलं. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही संघटना स्थापन झाली होती. या संस्थेत त्यांनी निष्ठेनं काम केलं. सामाजिक, शैक्षाणिक, राजकीय, आरोग्यविषयक अनेक चळवळी त्यांनी गाजविल्यात.

समाज हा एकसंध असायला हवा. त्यासाठी सोनबाजी जाधव (नाईक) यांनी संपूर्ण भारतभर लोकसंग्रहाचं कार्य केलं. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, भूविकास बँकेचे संचालक अशा अनेक पदांवर राहून सोनबाजी जाधव (नाईक) यांनी आपला लोकसेवेसा वसा जवळपास 40 वर्ष कायम ठेवला. आपल्या वडिलांची ही लोककार्याची परंपरा विजय जाधव (नाईक) यांनी जोपासली. त्यांनीदेखील विविध पदांवर राहून अनेक क्षेत्रांत भरीव कामगिरी बजावली व आजही ते प्रभावीपणे बजावित आहेत. जनकल्याणाचं बीजारोपण हे डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) यांच्या मनात बालपणापासूनच झालं होतं. लोकहितासाठी त्यांची धडपड आजही अव्याहतपणे सुरूच आहे.

आपल्या आजोबांचा आणि वडीलांचा वारसा डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) यांनी पुढे चालविला. आपल्या विद्यार्थीदशेपासूनच ते सामाजिक क्षेत्रांत उतरलेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी मेळघातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्य शिबिरं घेतलीत. वैद्यकीय शिक्षण 2002मधे त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ येथील वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल येथे रुग्णसेवेला आरंभ केला. अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने त्यांनी रुग्णसेवेला वाहून घेतलं.

अनेक रुग्णांना छोट्या-मोठ्या अडचणीमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केलं जातं. तालुका पातळीवर तशी आरोग्य यंत्रणा नसते. गोर-गरीब, सामान्य, मध्यमवर्गीय रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नसायचा. ही बाब लक्षात घेता त्यांनी दिग्रससारख्या लहानशा गावात ‘नाईक हॉस्पिटल’ सुरू केलं. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आता ते अत्यंत सुविधेचं आरोग्यकेंद्र झालं. याही पलीकडे महत्त्वाचं म्हणजे दिग्रस ग्रामीण रुग्णालयात ते ‘मानद डॉक्टर’ म्हणूनदेखील सेवा देत आहेत.

आपल्या सामाजिक, राजकीय क्षेत्रासारखेच आपल्या वैद्यकीय क्षेत्रांतदेखील ते एक्स्पर्ट आहेत. रुग्णांना त्यांचा विषेष आधार वाटतो. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक गरजू रुग्णांवर सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात काम करणारे पश्चिम विदर्भातील कदाचित एकमेव डॉक्टर असावेत.

स्वतः वैद्यकीय क्षेत्रातले असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत ते नेहमी दक्ष असतात. विविध सामाजिक आणि राजकीय पदांवरून त्यांनी आपल्या कार्याच्या कक्षा आणि दिशा वाढवल्यात. रोटरी क्लब ऑफ दिग्रसचे ते अध्यक्ष झालेत. दिग्रस आणि मानोरा तालुक्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरींचा सपाटाच लावला. नॉदर्न वेलफेअर फाउंडेषन युनायटेड किंगडमच्या माध्यमांतून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरं घेतलीत. विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांनी ग्रामीण भागात आणलेत. ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी 100 बेडस्चं हॉस्पिटल असावं असं त्यांचं स्वप्न होतं. आरोग्यधाम हेल्थ केअर फाउंडेशची स्थापना याच प्रयत्नातून झाली. स्थानिक डॉक्टर्सच्या सहकार्याने संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर दिग्रस येथे सुरू झालंय. महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं कार्य ते अव्याहतपणे करीत आहेत. फाउंडेशनच्या वतीने आरोग्य, वैद्यकीय शिक्षणाचा आरंभ करण्याचादेखील त्यांचा मानस आहे.

संत सेवालाल महाराजांच्या विचारांची व कार्याची दिशा त्यांना आहे. याच प्रेरणेतून त्यांनी संत सेवालाल महाराज जयंती व पुण्यतिथी उत्सवांत आरोग्य, रक्तदान, शस्त्रक्रिया शिबिर ते घेतात. महान तपस्वी काशिनाथ बाबा यांच्या जयंती व पुण्यतिथीलादेखील अशाच प्रकारची शिबिरं ते घेतात.मुंबई, नागपूर, नांदेड, औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टर्संची सेवा ग्रामीण रुग्णांना ते देतात. कारंजा येथे एकाच दिवशी 7 हजार 200 रुग्णांची तपासणी व औषधोपचाराचा विक्रमही त्यांनी घडविला आहे.

बंजारा काशी पोहरादेवी आणि उमरी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी धडाडीचे प्रयत्न केलेत. मा. संजयभाऊ राठोड यांच्या माध्यमातून त्यांनी विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. इथली कैफियती त्यांनी शासन दरबारी मांडल्यात. भक्तांसाठी भक्तनिवास, पाणी, शौचालय, इत्यादी बाबींवर त्यांनी काम केलं. ‘स्वच्छ यात्रा, शुद्ध यात्रा, सुंदर यात्रा’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी या तीर्थक्षेत्रांमधे स्वच्छता अभियान राबविले. त्यांच्या या कार्याचा शासनाने गौरव करत त्यांची वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक पदी अलिकडेच निवड केली आहे.

गोर बंजारा कोअर कमिटीच्या माध्यमातून त्यांनी विविध मोठी कामं केलीत. मा. संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलं. तांडा, वस्त्या आणि वाडींतील समस्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या. कर्नाटकच्या धर्तीवर सेवालाल विकास महामंडळाची स्थापना करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजना राबविणे अषा अनेक उद्देशांसाठी त्यांची धडपड अजूनही सुरूच आहे.

डॉक्टर हा देव समजला जातो. अलीकडच्या काळात मात्र त्याचं व्यावसायिक स्वरूपच वाढलं आहे. मात्र अशा वातावरणातदेखील डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) हे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करीत आहेत. समाज माझा आहे. मी समाजाचा आहे, ही जाणीव ते सातत्याने ठेवतात. जगद्गुरू तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणावे आपुले’ हे व्रत डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) अविरतपणे करीत आहेत. आपला वडलोपार्जित सामाजिक कार्याचा वारसा ते अत्यंत दक्षतेने चालवीत आहेत. माणसाला माणूस म्हणून सन्मानानं जगता यावं हे त्यांचं ध्येय. आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा अनेक हक्कांच्या गोष्टी त्यांना मिळाव्यात म्हणून त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. समाजासाठी अखंड झटणा-या डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी सदिच्छा…..
लेख- संजय जाधव
वार्ताहर उमरी(खु) ता. मानोरा, जि. वाशीम

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.