कॅन्सर हा बरा होणारा आजार: डॉ. नितीन पांडे

कॅन्सर रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दिग्रस (प्रतिनिधी): लोकांची अशी धारणा आहे की कॅन्सर या रोगावर उपचार नाही. हा रोग झालेल्या व्यक्तींचा हमखास लवकरात लवकर मृत्यू होतो. मात्र ही धारणा चुकीची असून कॅन्सर 100 टक्के बरा होऊ शकतो. फक्त या रोगाचे योग्य वेळी निदान होणे व यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचे डॉ. नितीन पांडे यांनी केले. दिग्रस येथील डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्सर रोगनिदान व उपचार शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. पांडे म्हणाले की विदर्भात खर्रा गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहेत. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. महिला स्तनाच्या कॅन्सरची प्राथमिक चाचणी स्वतःच करू शकते. छातीत अशी गाठ आढळल्यास ती त्वरित डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करू शकते. हा रोग अनुवांशिक आहे. त्यामुळे 30 वर्षांनंतर वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते, असे ही ते म्हणाले.

दिग्रस मध्ये शनिवार दिनांक 4 मे रोजी कॅन्सर रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर सकाळी 11 ते 02 दरम्यान स्थानिक डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. या शिबिरात सुमारे 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ञ डॉ. निखिल पांडे यांच्यासह डॉ व्यंकटेश रेवाळे, डॉ. उमेश भुतेकर यांनी रुग्णांची तपासणी केली. दिग्रस डॉक्टर्स असोसिएशन व आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गरजू रुग्णांवर होणार शासकीय योजनेतून उपचार: डॉ. जाधव
या रोगाबद्दल अनेक नकारार्थी गोष्टी लोकांमध्ये आहेत. यात मुख्यतः कॅन्सर हा रोग शहरवाल्यांचा, श्रीमंतांचा आहे अशी चुकीची धारणा लोकांमध्ये आहे. मात्र असं काहीही नाही. हा रोग कुणालाही होऊ शकतो. फक्त गावखेड्यातील माणूस दवाखान्यात उपचारासाठी पोहोचत नसल्याने त्याचे निदान होत नाही. ग्रामीण भागातील लोकांमध्ये कॅन्सरचे निदान होऊन त्यांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन कऱण्यात आल्याचे डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी सांगितले. ज्या रुग्णांमध्ये कॅन्सरचे निदान झाले आहे अशा रुग्णांवर शासकीय योजनेद्वारे सर्व उपचार केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. 
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील यांच्यासह दिग्रस डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य यांच्यासह डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटलची चमुंनी परिश्रम घेतले.
Leave A Reply

Your email address will not be published.