मुकुटबन व परिसर मिळून ४०० ते ५०० बोगस जुने मीटर लावण्यात आले होते. यातून लाखो रुपये काही लाइनमननी खासगी तरुणांना हाताशी घेऊन कमाविल्याची माहिती तत्कालीन अभियंता पांडे यांना मिळताच त्यांनी ३०० बोगस मीटर काढले. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात बोगस जुने मीटर शिल्लक आहे. त्याचा वापर कनेक्शन कट करण्यात आलेल्या व्यक्तीच्या घरी होत असल्याची ओरड आहे. असाच प्रकार मांगली गावातही सुरू आहे. गावासह परिसरात वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात जुने बोगस मीटर लावण्यात आले असताना अधिकारी अनभिज्ञ कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काढलेले जुने मीटर जमा का करण्यात आले नाही, जमा केले तर मीटर कुणाच्या सांगण्यावरून बाहेर काढून ग्राहकांना देण्यात आले, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दोन ते तीन वर्षे मीटर लावण्यात आलेल्या ग्राहकांना वीजबिल का आले नाही, मीटर बिलाची बोगस वसुली कोणी केली, वसूल केलेली रक्कम गेली कुठे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. बोगस मीटर लावण्याच्या नावाने कागदपत्रे घेणारा व्यक्ती कोण, त्याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. मुकुटबन येथे चोरी करून काही ग्राहक वीज चालवित असल्याची माहिती येथीलच खासगी लाईनमनची कामे करणाऱ्या लोकांना होती.
ही माहिती लाइनमनला हाताशी धरून चोरी करून विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या घरी जाऊन चोरी पकडून त्यांना धमकावून पैसे उकळ्याची चर्चा आहे. मुकुटबन येथील विद्यानगरीत दोन शिक्षकांच्या घरीसुद्धा वीज चोरीचा असाच प्रकार घडला व दोन्ही शिक्षकांना धमकावून ७५ हजार रुपये वसूल करून हिस्सेवाटणी के ल्याची चर्चा आहे. एका शिक्षकाकडून ३५ हजार तर दुसऱ्याकडून ४० हजार रुपये घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. वीज वितरण कंपनीमध्ये धमकी देऊन लुटण्याचा तसेच बोगस कनेक्शन लावून पैसा उकळण्याचा गोरखधंदा गतदोन वर्षात चांगलाच वाढला आहे. उपकार्यकरी अभियंता राहुल पावडे आल्यापासून अनेक बोगस कामांवर अंकुश बसला असला तरी हा गंभीर प्रकार थांबलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे या गैरप्रकारावर कारवाई करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे..