विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना तसेच बार व वाईनशॉप बंदचे आदेश दिले असताना ही परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरू आहे. आज बुधवारी वाघदरा येथे दारूची छुप्या रितीने अवैध विक्री करताना चार जणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 23,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
वणी बाहेरील वाघदरा परिसरात दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली. त्यानुसार वणी पोलिसांनी 12 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी धाड टाकली व चार आरोपींना अटक केली.
नीलेश मधुकर पनगंटीवार, भारत दुर्गना रामगीरवार, दुर्गा रवीसिंगार पवार, सविता चरणदास अंबरवार रा. वागदरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी दारूच्या 8 पेट्या जप्त करण्यात आल्या. त्यांच्यावर कलम 65, 188 भादंवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विठ्ठल बुरेवार करीत आहे.
वणीतही अनेक ठिकाणी दारूची विक्री व चंद्रपुरात सप्लाय
संचारबंदी दरम्यान वणीतही काही ठिकाणी अत्यंत छुप्या पद्धतीन दारूची विक्री सुरू आहे. तसेच वणीतून चंद्रपूर जिल्ह्यातही दारूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. सध्या वणीत अवैध दारूचे रेट हे दुप्पट ते तिपटीने वाढल्याने त्याची विक्री काही प्रमाणात कमी झाली असली तरी विक्री मात्र सुरूच आहे. अशा अवैध विक्रीतून संसर्ग वाढण्याचाही धोका आहे. त्यामुळे या अवैध विक्रीसह वणीतून अवैधरित्या चंद्रपुरात होणारा दारूचा पुरवठा बंद व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे.