नागरिकांच्या ‘या’ चुकांमुळेच वाढू शकतो “कोरोना” प्रादुर्भाव

यवतमाळ येथे आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संपूर्ण नायनाटसाठी संचारबंदी व कलम 144 लागू असताना वणी शहरातील नागरिकांकडून किराणा दुकानं, मेडीकल,भाजीपाला, पेट्रोलपंपावर तेल खरेदी करताना, बँकेत व एटीएमवर पैसे काढत असताना अजिबातच सोशल डिस्टेंसिंग पाळले जात नाही ! त्यामुळे लाॕकडाऊनमध्ये शहरात सोशल डिस्टेंसिंगला पुरती तिलांजली दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनजागृती करून, समज देऊन तसेच दंड आकारूनही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे पोलिस प्रशासन देखील याबाबत हतबल झाल्याचे दिसत आहे. दरम्यान यवतमाळ येथे आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता यवतमाळमध्ये कोविड-19 पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात पूर्वी प्रमाणेच कलम 144 व संचारबंदी लागू आहे. मात्र वणी शहरात गांधी चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, दीपक टॉकीज चौपाटी, साई मंदिर या भागात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजे पर्यंत ग्रामीण भागातून आलेले व शहरातील नागरिकांचे भाजीपाला व इतर खरेदीसाठी दुकानांवर झुंबड दिसत आहे. लॉकडाउन दरम्यान शहर पोलिसांनी काही दिवस सतत पेट्रोलिंग करून अकारण फिरणाऱ्यावर कठोर कारवायांसुद्दा केली. परंतु मागील 8 दिवसापासून शहरात पोलीस प्रशासन आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार लॉकडाउन काळात दुचाकी वाहनांवर एक व्यक्ती व चारचाकी वाहनांमध्ये चालकसह दोन व्यक्तींना बसण्याची परवानगी आहे. मात्र शहरात दुचाकीवर तीन ते चार स्वारी तर ऑटो व कार मध्ये 4 ते 6 व्यक्ती बिनधास्त फिरत असताना पोलीस कारवाई का करीत नाही? बाजारात अनेक व्यक्ती तोंडावर मास्क न लावता मुक्त वितरण करताना पाहायला मिळत आहे. येथील नांदेपेरा मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉक तर सायंकाळी इव्हनिंग वॉक करायला आबालवृद्ध फिरताना रोजचे दृश्य आहे.

आंबेडकर चौक आणि बँकेसमोर असलेली गर्दी

शहरातील साई मंदिर, टिळक चौक, दीपक टॉकीज या ठिकाणी कायमस्वरूपी नेमलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड सुद्दा खुर्चीवर बसून मोबाईल हाताळताना नजरेत पडत आहे. एकूणच वणीकरांच्या या चुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

यवतमाळ येथे आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण सापडला

आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता यवतमाळमध्ये कोविड-19 पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 9 झाली आहे. सदर व्यक्ती हा एका पॉझेटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य असून तो 9 एप्रिलपासून आयसोलेशन वॉर्डात भरती आहे. तपासणीसाठी त्याचे पहिले नमुने 9 एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर 19 एप्रिल रोजी परत नमुने पाठविले असता सदर व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह प्राप्त झाला आहे. पॉझेटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांनी आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वत: समोर येऊन प्रशासनाला माहिती द्यावी व वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 15 असल्यामुळे जिल्ह्याला रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी कोरोनाबधितांची संख्या कमी होत आहे, मात्र यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा रेडझोन मधून कधी निघणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.