जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राने कोळसा उत्पादन, ओबी रिमुव्हल व डिस्पॅचमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 107 टक्के वाढ केली आहे. तसेच रेल्वे सायडींग वरून एका वर्षात 911 रॅक म्हणजे जवळपास 35 लाख टन कोळसा यशस्वीरित्या मागणीदारांना पुरवठा करून एक नवा विक्रम रचला आहे. काही खाणी बंद झाल्याने वेकोलि व्यवस्थापनासमोर मर्यादीत स्रोतात एवढा मोठा कोळशाचा साठा विकणे, डिस्पॅच करने आणि बंद खाणींना सुरू करणे एक मोठे आव्हानच होते. परंतु या क्षेत्राचे महाप्रबंधक आर के सिंग यांनी हे आव्हान स्वीकारून दोन वर्षात या क्षेत्राला यशाच्या शिखरावर पोहोचवीले.
वेकोलि वणी नार्थने वर्ष 2019-20 साठी ठरवलेले लक्ष्य 38.25 लाख टनाऐवजी 39.31 लाख टन उत्पादन केले आहे. मागील वर्षीच्याच्या तुलनेत हे 107 टक्के जास्त आहे. ओबी रिमूव्हल पण मागील वर्षीच्याच्या तुलनेत 48 टक्के जास्त आहे. 35 लाख 30 हजार मेट्रीक टन कोळसा आतापर्यंत डिस्पॅच केला आहे. हे देखील मागील वर्षीच्याच्या तुलनेत 44 टक्के जास्त आहे. महत्वाचे म्हणजे उपरोक्त तीन्ही बाबतीत वणी नार्थ क्षेत्र संपूर्ण वेकोलित आघाडीवर आहे.
दोन वर्षापूर्वी कोळसा चोरी येथील मुख्य समस्या होती. पण महाप्रबंधक आर के सिंह यांनी कोल माफीयांच्या बाबतीत कठोर भूमिका घेत कोळसा चोरीवर आळा घातला. कोरोना व्हायरसमुळे उद्भववलेल्या संकटामध्ये गरीब आणि बेघरांसाठी कंपनीने गरजू लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न पुरविले. वेकोलि व्यवस्थापनातर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कर्मचा-यांना 4 हजार मास्क वाटण्यात आले आहेत.
वेस्टर्न कोलफील्ड्स कंपनी (वेकोलि) वणी नार्थ क्षेत्र हे कोळसा उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. देशभरातील विविध उद्योग, कारखाने, वीज प्रकल्पासाठी इथून कोळसा पुरवला जातो. या क्षेत्रातील कोळशाला प्रचंड मागणी असते. या क्षेत्राअंतर्गत कुंभारखनी, भांदेवाडा, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंपरी, उकणी, घोन्सा खाणीचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पादन कोलारपिंपरी कोळसा खाणीतून होते.
सन 2016-2017 मध्ये वेकोलि वणी उत्तर क्षेत्राचे उत्पादन कमी होउन रोजचा दर हा चार हजार मेट्रीक टनवर आला होता. कुंभारखनी, पिंपळगाव, कोलारपिंपरी आणि घोन्सा खाण बंद पडलेली होती. शेकडो कर्मचा-यांवर बदलीची टांगती तलवार होती. उकणी खाणीत 17 लाख टन कोळशाचा साठा झाला होता. कोळसा स्टॉक करण्यासाठी जागा नसल्याने उकणी खाण बंद करावी लागली होती. या क्षेत्राला माजरी क्षेत्रात विलीन करण्याची तयारी सुरू झाली होती.
तीन वर्षापासून बंद पडलेल्या घोन्सा खाणीला डिपार्टमेंटल सुरू करून त्यातून एका वर्षात 6 लाख टन कोळसा काढणे ही सुदधा एक मोठी उपलब्धी आहे. ही खाण सुरू झाल्यामुळे 150 कर्मचार्याचे स्थालांतरण थांबले हे विषेश. कोळसा उत्पादनात अग्रेसर या क्षेत्रातल्या दोन खाणी म्हणजे उकणी व कोलारपिंपरी. या दोन्ही खाणींची मुदत संपल्याने त्यांचा विस्तार करणे गरजेचे होते व त्यासाठी भूमिअधिग्रहण पासून तर प्रदूषण, लोकसुनावणी ईत्यादी बाबी होत्याच. कोलारपिंपरी खाण विस्तारीकरणात 137 कोटी रूपये मोबदला देउन 710 हेक्टर जमीनीचे अधिग्रहण करून 402 लोकांना नोकरी देण्यात आली आहे.
वेकोलिचे चेअरमन तसेच सह प्रबंधक आर आर मिश्रा यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावला. त्यांनी नवीन खाणी सुरू करण्यासाठी तसेच बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी योजना आखली. त्यात कोलारपिंपरी, उकणी व घोन्सा या खुल्या खाणीचा समावेश होता. यासह कर्मचा-यांची मत जाणून घेण्यासाठी त्यांनी भालर टाऊनशिप येथे भेट देऊन कर्मचा-यांशी चर्चा केली. त्यात कर्मचा-यांनी मिश्रा यांच्या कार्यबाबत प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
व्यवस्थापनाद्वारा गेल्या साडे तीन वर्षांपासून खाणीच्या परिसरातील गावातील रहिवाशांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. त्यात घोन्सा येथे 2 हजार लीटरच्या ओव्हरहेड टाकीची निर्मिती, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल, गोवारी गावात 30 हजार लीटरची टाकी व बोअरवेल, इजारा (राजूर) येथे 2018 साली पाण्याच्या टाकीची निर्मिती तसेच नांदेपेरा येथील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. परिणामी त्यामुळे या नाल्याद्वारे भांदेवाडा आणि राजूर येथे पाणी सोडणे शक्य झाले असून त्याचा शेतीसाठी उपयोग होत आहे. पुनवट येथे तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील सर्व गावातील जिल्हा परिषद शाळेत आरओ, सिलिंग फॅन व वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. आधार अनाथ आश्रमाला फ्रीज व तीन सिंलिंग फॅन, वाटर कुलर तर वणीतील सिद्धार्थ बालसदन अनाथ आश्रमाला बॅटरीसह इनव्हरटर व आऩंदवन आश्रमातील 500 मुलांसाठी 25 लीटरचा वॉटर कुलर देण्यात आला.