नागेश रायपुरे, मारेगाव: मंगळवारी राजुर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. यातील कुंभा येथील तिघे तर नेत (वरूड) येथील 8 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना मारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
राजुर (कॉलरी) येथील एका 35 वर्षीय महिलेवर हृद्यरोगासंबंधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. डॉक्टरांनी त्या महिलेला शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान कुंभा येथील एक दाम्पत्य या महिलेच्या सेवेसाठी राजुर येथे थांबले होते. दरम्यान रुग्णाच्या शस्त्रक्रियेपुर्वी त्या महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात ती महिला पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे कुंभा येथील त्या दाम्पत्यासह आणखी एक पुरुष व नेत (वरुड) येथील संपर्कात आलेले 8 व्यक्ती अशा 11 व्यक्तींना मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळेत कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
आजपर्यंत मारेगावातील एकही व्यक्ती कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेली नव्हती. मात्र आता एकाच वेळी तालुक्यातील 11 व्यक्ती संपर्कात आल्याने त्यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून तालुका प्रशासन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. तसेच वणी शहराच्या संपर्कात लोकांनी येऊ नये याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.