तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरात शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या पाळीव गुरांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. हळूहळू या रोगाची व्याप्ती तालुक्यातील अनेक गावांत वाढत आहे. ऐन खरीप हंगामात जनावरे आजारी पडत असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मात्र पशु उपचार केंद्रातून जनावरांना योग्य उपचार मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
वणी तालुक्यात एकूण १३ पशुचिकित्सालये आहेत. मात्र बहुतांश पशुचिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकारीपद रिक्त असल्याने सेवकांद्वारे आजारी जनावरांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे पशुसेवक पशुवैद्य बनल्याचे दिसून येत आहे. तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन करून जनावरांवर योग्य उपचार करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
वणी तालुक्यातील मेंढोली, शिरपूर, पुरड, पुनवट, सावंगी, पिंपरी, बोरगाव, शिंदोला, येनक, टाकळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या बैल, गाय आदी जनावरांना संसर्गजन्य आजाराची लागण झपाट्याने होत आहे. रोगाची लक्षणे पाहता जनावरांना ‘लम्पि स्किन डिसीस’ झाल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी बोलतात. तर काही पशु चिकित्सकांच्या मते आजाराची लक्षणे पाहता सदर आजार हा ‘थायलेरियासिस’ असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा आजार गोचीड, माशा आदी चावणाऱ्या किटकांपासून पसरतो. हा रोग मार्च ते सप्टेंबर पर्यंत अधिक प्रमाणात असतो. संसर्गजन्य रोग असून जनावरांना तीव्र स्वरूपात ताप येतो. आजारी जनावरे चारापाणी घेणे बंद करतात. त्यामुळे जनावरे अशक्त होतात. खांद्यावर, पायावर सूज येते. तर काही जनावरांच्या अंगावर गाठी येऊन फुटतात. सदर रोगात लाल रक्तपेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. त्यामुळे जनावरे ८ ते १० दिवसात दगावतात.
या रोगांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार होत नसल्याने शेतकऱ्यांना आजारी गुरांवर खाजगी पशुवैद्यांकडून उपचार करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका आजारी जनावरांवर चार ते पाच हजार रुपये आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
उपचाराअभावी जनावरे दगावण्यास सुरुवात झाली आहे. २६ ऑगस्ट बुधवारी शिंदोला लगतच्या टाकळी येथील महादेव झाडे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. यात झाडे यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उपचार न मिळाल्याने बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी नेते दशरथ बोबडे यांनी मृत बैल वणीच्या पशुधन विकास अधिकारी कार्यालयाच्या अंगणात आणून संबंधित शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
तसेच तालुक्यातील आजारी जनावरांवर उपचार करण्याची मागणी करीत आपला संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या प्रारंभी शासकीय पशु चिकित्सालयामार्फत नाममात्र शुल्क आकारून लसीकरण केल्या जात होते. मात्र गत काही वर्षांपासून लसीकरण करणे बंद असल्याचे चित्र दिसत आहे.
केंद्र सरकार द्वारा ‘राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम’ आखलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लसीकरण करून रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाते. मात्र सदर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. गोचीड, माशा आदी किटकांपासून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या पाल्याचे द्रावण, तंबाखुच्या पानांचा उकळलेला अर्क फवारून गोठा स्वच्छ ठेवण्याचे काम शेतकरी करीत आहेत.