जब्बार चीनी, वणी: सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मोदी सरकार दोन कोटी लोकांना रोजगार देणार असे आश्वासन देणार म्हणून सत्तेत आलं मात्र त्यांनी बेरोजगारीसारख्या विषयाकडे साफ दर्लक्ष केले. त्यातच लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांचे छोटे मोठे व्यवसाय बुडाले व रोजगार गेले. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ युवक युवतींना रोजगार देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजन करावी, अशा आषयाच्या मागणीचे निवेदन वणी तालुका युवक काँग्रेस कमिटीने तहसिलदार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
देशाला नोटबंदीचा सर्वात मोठा फटका बसला. नोटबंदीमुळे सुक्ष्म लघू उद्योग बुडाले. परिणामी त्यावर अवलंबून असणा-या लाखो लोकांचा रोजगार गेला. त्यानंतर जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे लघू मध्यम उद्योग क्षेत्राचे कंबरडे मोडले. अशा चुकीच्या धोरणांमुळे व निर्णयामुळे देशात बेरोजगारी वाढली.
मोदी सरकारने कोणतेही पूर्वनियोजन न करता देशातील लोकांवर अचानक लॉकडाऊन लादले. अचानक लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 कोटी लोक बेरोजगार झाले. सरकारच्या सततच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून देशाच्या जी़डीपीने निच्चांक गाठला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने लवकरात लवकर बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलीय. निवेदनावर अशोक नागभीडकर, प्रदीप खेकारे, पवन सिडाम, गौरव जुमडे, प्रमोद ठाकरे, अमोल कुचनकर, प्रेमनाथ, खदीम मो. अनवर हयाती यांच्या सही आहेत.