वणीत जनता कर्फ्यू नाही, अल्प प्रतिसादामुळे निर्णय…
ट्रामाकेअर सेंटरला कोविड हॉस्पिटल करण्यासाठी हालचाली सुरू
जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. शहरातीलही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र जनता कर्फ्यूबाबत वणीकर जनता अनुत्साही असल्याच्या कारणाने जनत कर्फ्यू न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’ला माहिती दिली. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या ट्रामा केअर सेंटरला कोविड केअर सेंटर करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान ट्रामा केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
कल्याण मंडपम येथे जनता कर्फ्यू लावावा की नाही? बाबत घनघोर चर्चा झाली. काहींनी जनता कर्फ्यूच्या समर्थनात मत मांडले मात्र अधिकाधिक लोकांचा जनता कर्फ्यूला विरोध होता. चर्चेअंती आमदारांनी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईल असे जाहीर केले होते. मात्र वणीकरांचा जनता कर्फ्यूबाबत अनुत्साह बघता आमदारांनी अखेर जनता कर्फ्यू न लावण्याचे जाहीर केले.
लोक जनता कर्फ्यूबाबत अनुत्साही – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जनता कर्फ्यू लावावा का ? याबाबत वणीकरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जनता कर्फ्यूबाबत वणीकर उत्साही नसल्याचे दिसून आले. जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने पाळला जातो. जर जनताच याबाबत उत्साही नसेल तर तो लावून काहीच फायदा नाही. त्यामुळे जनता कर्फ्यू न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यू ऐवजी रुग्णांना अधिकाधिक सेवा, सुविधा देण्याकडे भर देऊ.– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र
ट्रामा केअर सेंटरमध्ये नवीन कोविड केअर सेंटर?
कल्याण मंडपम येथे आयोजित बैठकीत ट्रामा केअर सेंटरच्या जागेत कोविड केअर सेंटर येथे तयार करावे या मागणीने जोर धरला होता. अधिकाधिक व्यक्तींनी याबाबत सूचना केली होती. त्यावर आता विचार केला जात असून तिथे कोविड केअर सेंटर सुरू होऊ शकते का? याची चाचपणी केली जात आहे. याबाबत मंगळवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात यवतमाळ येथे गेल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रामा केअर सेंटर आहे. मात्र ते सेंटर सुरू न झाल्याने तिथली जागा सध्या रिकामीच आहे. तिथे 50 बेडची व्यवस्था आहे. शिवाय ही इमारतही नवीन आणि सुसज्ज आहे. पससोडा येथील कोविड केअर सेंटरबाबत रुग्ण व संशयीतांच्या प्रचंड तक्रारी आहेत. इथे होणा-या गैरसोयीबाबत व्हॉट्सऍपवर व्हिडीओ टाकून रुग्णांनी तिथे होणारी हेळसांड समोर आणली होती. जर ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू झाले, तर याचा तालुक्यातील रुग्णांना चांगला फायदा होऊ शकतो.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)