जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी साकारतेय मारेगाव तालुक्यात
पर्यवेक्षिकेच्या परिश्रमाला आले यश
रवि ढुमणे, वणी: वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी डिजीटल होणार आहे. जिह्यातील ही पहिलीच डिजीटल अंगणवाडी असल्याचे बोललं जात आहे. गुरूवारी या अंगणवाडीचं उद्घाटन होत आहे. नुकतंच मारेगाव तालुक्यात बदलून आलेल्या पर्यवेक्षिकेच्या परिश्रमाला यश आले आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासोबतच आता अंगणवाड्यासुध्दा डिजिटल करण्याचे फर्मान सोडले आहेत. याच पार्श्वभूमिवर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात बदलून आलेल्या पर्यवेक्षिका सुरेखा तुराणकर यांनी ग्रामीण भागातील मुलांना शहरातील महागड्या काॅन्व्हेंट सारखे ज्ञान मिळावे असा हेतू डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केले आहे.
कुंभा गावातून लोकवर्गणी गोळा करून तसेच ग्राम पंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून मदत घेत मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे डिजिटल अंगणवाडी साकारली आहे. त्यांनी अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी लागणारे साहित्य अशा अनेक बाबी डोळ्यांसमोर ठेऊन जिल्ह्यात पहिली अंगणवाडी डिजीटल करण्याचे धोरण आखले. कुंभा आठवडी बाजाराचे गाव आहे. या गावातील अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी पर्यवेक्षिका सुरेखा तुराणकर यांनी अपार कष्ट घेऊन आदिवासी तालुका असलेल्या गावात डिजिटल अंगणवाडी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
अखेर या प्रयत्नांना यश आले असून गुरूवारी या डिजीटल अंगणवाडीचा शुभारंभ महिला बाल कल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांचे उपस्थितीत पार पडणार आहे. सोबतच महिला बाल कल्याण प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सुध्दा येणार असल्याची माहीती आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविका यांचे सुध्दा अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी सहकार्य लाभले आहे.
एकूणच जिल्ह्यात पहिली डिजिटल अंगणवाडी आदिवासी असलेल्या मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे साकारण्याचा प्रयत्न पर्यवेक्षिका सुरेखा तुराणकर यांनी केला आहे. परिसरातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. तर काही शाळा ग्रामस्थांच्या उदासिनतेमुळे डिजिटल पासून वंचित आहे. ग्रामीण भागातील पहिले मंदिर असलेल्या शाळांकडे ग्रामीण भागातील जनतेनी लोकसहभाग दाखविला तर महागड्या खाजगी शाळांकडे कल नक्कीच कमी होणार व गावातील मुलांना संगणकीय ज्ञान मिळणार.
त्यासाठी गावातील अंगणवाड्या तसेच शाळा डिजीटल करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. उत्साही शिक्षक अथवा पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ जर एकत्रीत आले तर खाजगी शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील अंगणवाडी तसेच शाळा आगामी काळात अव्वल ठरेल हे सत्य आहे.