मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
झरी नगरपंचायत चा कारभार चव्हाट्यावर, पोलीस स्टेशनला तक्रार
सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता केली नाही. ती फसवणूक असल्याचा आरोप करीत उपोषणकर्यांनी पाटण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. नगरपंचायतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचीदेखील मागणी केली आहे.
मागे १५ जुलै २०१९ रोजी गावातील पीडित जनता विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसली होती. अपंगाच्या ५ टक्के निधीचे वाटप त्वरित करावे, नगरपंयाचत हद्दीत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई करावी. दाट वस्तीच्या ठिकाणी रोड व नाली बांधकाम करावे. घंटागाडी बंद असल्याने शहरात घाण वाढत आहे. त्यासाठी घंटागाडी सुरू करावी. ट्युबवेलच्या ऐवजी गावात बोरवेल मारण्यात आले. इतर अनेक समस्या घेऊन जागोम दल संघटनेनी उपोषणाला सुरवात केली होती.
उपोषणादरम्यान झरी नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १७ जुलै २०२० रोजी लिखित स्वरूपात संपूर्ण मागण्या त्वरित पूर्ण करू असे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण थांबविले होते. एवढा काळ लोटूनही मुख्य मुद्दे तसेच आहेत. नगरपंचायत कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आजही घरकुलचे लाभार्थी नगरपंचायतीच्या पायऱ्या झिजवत आहेत. पावसाळा असून कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून उघड्यावर रहावे लागत आहे.
नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पाटण पोलीस स्टेशनला कालिदास अरके, शकुंतला ताडुरवार, विजया कोंडावार, कमलाबाई येरेवार, संगीता सोयाम, नागाबाई चकुलवार, रज्जूबाई, कुडमेथे, पिंटू सोळंके, पच्चूबाई मिरलवार यांनी दिली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)