मातीत राबणाऱ्यांचे मानलेत तिने ’असे’ आभार
निमित्त डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांच्या वाढदिवसाचे
सुशील ओझा, झरी: तरुण डॉक्टरचा वाढदिवस म्हणजे एरवी हायफायच सेलिब्रेट होतो. एखादं मोठं हॉटेल, हाय प्रोफाईल गेस्ट वगैरे. या परंपरेला तडा दिला एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांनी. शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करून त्यांनी आपला वाढदिवस अगदी साध्यापद्धतीने साजरा केला. भेटवस्तू देऊन आणि सत्कार करून त्यांनी मातीत राबणाऱ्यांचे असे आभार मानलेत.
पाटण येथे अलोणे परिवाराची वडलोपार्जित शेती आहे. वडील प्रा. डॉ. दिलीप अलोणे सेवानिवृत्त प्राध्यापक, जादुगर आणि कलावंत आहे. त्यासोबतच डॉ. अलोणे यांची एक कृषितज्ज्ञ, जादुगर आणि यशस्वी कलावंत म्हणून त्यांचा लौकिक आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची नेहमीच धडपड असते. ते नेहमीच त्यासाठी विविध प्रयोग, कार्यशाळा आणि मागदर्शन शिबिरंही घेतात.
डॉ. रसिका, डॉ. संकेत आणि डॉ. अनिकेत ही भावंडांचीदेखील शेतीशी नाळ जुळलेली आहे. डॉ. रसिका अलोणे ह्यांच्या आई मेघा उर्फ देवयानी ह्यादेखील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. हा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासत डॉ. रसिकांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं.
शेतकरी आणि शेतमजूर हे विश्वाचे अन्नदाते आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉ. रसिका ह्यांनी केला. पाटण येथील त्यांच्या शेतातच हा छोटेखानी सोहळा झाला. उपसरपंच प्रवीण नोमुलवार आणि प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांच्या हस्ते शेतकरी आणि शेतमजुरांना ब्लँकेट आणि भेटवस्तू देण्यात आल्यात.
यावेळी अशोक आईटवार, रामलू बोमकंटीवार, श्रीकांत वल्लभकर, शेतकरी आणि शेतमूजर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. रसिकाने यानिमित्ताने समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)