सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी होऊन शेतात ढीग रचून ठेवलेले आहेत. या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन कापणी सुरू आहे. पावसामुळे सोयाबीन काळे पडण्याची शक्यता बळावली आहे. तर शेतात कापूस फुटलेला आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने पावसाने कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही ठिकाणी तुरळक व जोरदार पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत आणखीनच भर पडली आहे. शेतकरी वर्षभर शेतात राबून काबाडकष्ट करून मातीत पैसा टाकून पीक मोठे करून त्याची रखवाली करून ते घरी येईपर्यंत त्याला सुखाची झोप लागत नाही. आधीच आर्थिक अडचण आणि त्यात निसर्गाने दगा दिला. त्यात आणखीनच भर पडेल. पिकमालाला रास्त भाव नाही. निसर्गाचा मार या दुहेरी संकटात जगाचा पोशिंदा सापडला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)