संकटांची न करता कीव, ती वाचवते इतरांचा जीव

चिंचमंडळची लेक डॉ. अर्चनाची अद्भूत यशोगाथा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: संकटांची ती कधीच पर्वा करत नाही. ती अढळ आहे. याही संकटकाळात ती इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवा देतच आहे. मारेगावा तालुक्यातील चिंचमंडळ म्हणजे एक छोटंसं खेडं.

इथली सामान्य परिवारातील अर्चना देठे इंगळे हिने आपल्या कतृत्त्वाने उंच भरारी घेतली. अथक परिश्रम घेऊन आज तालुका वैद्यकीय अधिकार म्हणून त्या आरोग्यसेवा देत आहे. हा त्यांचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा असाच आहे.

दृढ निच्छय जीवनाला सार्थक बनवतो. डॉ.अर्चना देठे यांचा दृढनिश्चय त्यांच्या आणि इतरांच्या जीवनाचं सोनं करीत आहे. अगदी लहानपणापासूनच भविष्यात डॉक्टर बनून जनतेची आरोग्य सेवा करायची इच्छा शक्ती त्यांच्या मनात जागृत झाली.

त्यांनी जीवनाच्या खड़खर प्रवासात आलेल्या कठीण परिस्थितीवर मात करुन आज तालुका वैधकीय अधिकारी म्हणून तालुक्यातच आरोग्य सेवा देत आहेत. अवघ्या मारेगाव तालुक्यासाठी ही गौरवाची बाब आहे.

आदिवासीबहूल म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख असलेल्या चिंचमंडळ या खेड्यात डॉ. अर्चना देठे यांचा जन्म झाला. डॉ.अर्चनाचे वडील वाल्मिक देठे हे शिक्षक होते. तर आई कांताबाई या गृहिणी आहेत.  वडील वाल्मिक देठे शिक्षणाप्रती जागृत होते.

केवळ अर्चनाच नव्हे तर सर्वच मुलांना त्यांनी उच्चशिक्षण दिलं. धीरज सध्या कृषी सहायक आहेत.  सुहास हे यशस्वी इंजिनिअर आहेत. बहीण रजनीदेखील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहे. असा सहा जणांचा परिवार. त्या काळी मिळणाऱ्या वडिलांच्या जेमतेम पगारातून डॉ. अर्चना देठे यांचा जीवनाचा खडतर प्रवास चालू झाला.

डॉ. अर्चना देठे यांचे प्राथमिक शिक्षण चिंचमंडळ येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग 4 थी पर्यंत, वर्ग 6 ते 10 नांझा ता.कळंब येथील आश्रमशाळेत झाले. तर वर्ग 11, 12 एस.पी.एम. हायस्कूल वणी येथे झाले.12 वीत सायन्स मध्ये 89% टक्के गुण घेऊन त्या हायस्कूलमध्ये प्रथम आल्या होत्या. MBBSचे वैद्यकीय शिक्षण अमरावती येथे झाले. तर वैद्यकीय पदवुत्तर शिक्षण नागपूर येथे झाले.

डॉक्टर होऊन जनतेची सेवा करण्याची जिद्द ही अगदी वयाच्या 14 व्या वर्षांपासून मनात ठाम होती. सोबतच कुटुंबियांनीसुद्धा सपोर्ट केला. आणि सुरू झाला प्रवास. वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्याच पायरीवर महाविद्यालयात सगळे विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलायचे.

डॉ. देठे यांना भाषा समजायची, मात्र त्या खेड्यातून असल्याने त्यांना इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलत येत नव्हते. त्या खेड्यातील असल्याने व इंग्लिश बोलता येत नसल्याने त्यांच्यासोबत मैत्रीसुद्धा कोणी करत नव्हते.

त्यांचे डॉक्टर होण्याचे मनोधैर्य खचले होते. मात्र त्या डगमगल्या नाही. त्यांनी स्पोकन इंग्लिशची सेल्फ स्टडी करून डॉक्टर होण्याची इच्छा उराशी बाळगून पुन्हा आत्मविश्वासाने त्या मैदानात उतरल्या.दरम्यान काही दिवसांतच त्यांचे टेलेंट पाहून मित्रांचा गोतावळा निर्माण झाला.

वैद्यकीय शिक्षण संपताच त्यांनी अमरावती व तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय प्रॅक्टिस केली. दरम्यान जवळच असलेल्या वरोरा तालुक्यातील माढळी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. दरम्यान तिथेच कार्यरत असलेले डॉ. सुभाष इंगळे यांच्यासोबत आचारविचार पटल्याने सर्वांच्या संमतीने 15 मे 2005 मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या.

पती डॉ. सुभाष इंगळे यांच्या सपोर्टमुळे त्यांनी 2014/2016 दरम्यान त्यांनी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले. नंतर पुन्हा 1 वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात प्रॅक्टीस केली. सन 2018पासून त्या मारेगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होऊन कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे आपल्याच तालुक्यात अधिकारी म्हणून जनतेच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडत असताना आनंद होत असल्याचे मत त्यांनी ‘वणी बहुगुणी’ बोलताना दिले.

मृत्यूच्या दाढेतून तिने प्राण खेचून आणलेत.

माढळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वन्य प्राणी रानडुकराने जीवघेणा हल्ला केला. त्यात त्या रुग्णाची पाट, पोट, पाय, मांडी पूर्ण चिरलेली होती. तो रक्तबंबाळ अवस्थेत चीत पडला होता. शरीरातून खूप जास्त रक्त वाहिले. त्यांचे वाचण्याचे चान्सेस नव्हतेच. ते दृश्य पाहून डॉ. अर्चना ह्यांना थरकाप सुटला. मात्र न डगमगता शरीरावर सतत चार तास त्यांनी स्टिचिंग केलं. वेळेवर उपचार करून त्याला मृत्युच्या मुखातून ओढले.मृत्यूच्या दाढेतून त्यांनी प्राण खेचून आणलेत.

 

 

तालुका कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न

तालुक्याला लागूनच असलेल्या वणी, केळापूर तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर पाहून त्या डगमगल्या नाही. मारेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी असल्याची जबाबदारी पाळत त्यांनी बाहेरून आलेल्या व्यक्तींची तात्काळ तपासणी करून त्यांना होम कोरोन्टाईन केले. तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तपासणी शिबिरे घेतली.

प्रशासनाची वेळोवेळी बैठक बोलवून योग्य नियोजन करून कोरोनाविषयक जनजागृती केली. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर योग्य उपाय योजना आखल्याने आजच्या स्थितित सध्या मारेगाव तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. खऱ्या अर्थाने त्या कोरोनायोद्धा बनल्या आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.