वणी तालुक्यातील कपाशीचे पीक बोंडअळीच्या विळख्यात
बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी उध्दवस्त
तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरातील शेतात यंदाच्या हंगामात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता कपाशी राखून काहीच उपयोग नाही.
म्हणून ओलिताची सोय उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने किंवा मजुरांकरवी पऱ्हाट्या काढण्यास सुरुवात केली आहे. कपाशीचे पीक बोंडअळीच्या विळख्यात सापडले आहे. परिणामी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णतः उध्दवस्त झाला आहे.
वणी तालुक्यातील शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरातील शिरपूर, वारगाव, मेंढोली, वरझडी, बोरगाव, पिंपरी, बाबापूर, मोहदा, वेळाबाई, खांदला, शिंदोला, कुर्ली, चनाखा, कळमना, परमडोह, येनक, सावंगी आदी शिवारातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कपाशीचा पहिला वेचा सुरू आहे. यात एकरी तीन ते चार क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळत आहे. मात्र हिरव्यागार दिसणाऱ्या उर्वरित कपाशी पिकाचा अळीने फडशा पाडला आहे. आता कपाशी राखून कवडीचाही उपयोग नाही. म्हणून ओलिताची सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी पऱ्हाटी उपटून रब्बीची पिके घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत.
नुकतेच शिंदोला येथील धर्मा मोहितकार, चनाखा येथील वामन झाडे, पिंपरी येथील श्रावण ताजने, महादेव मोहितकर आदी शेतकऱ्यांनी कपाशीवर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरातील बहुतांश शेतकरी कपाशी उपटून हरभरा, मूग आदी पिकांची पेरणी करताना दिसत आहे.
तर काही शेतकऱ्यांनी पिकात जनावरे चराईसाठी सोडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करावी. शासनाने शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.