पक्ष्यांचा शिकारीच जेव्हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो….
आज पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती, पक्षिसप्ताहाचा समारोप
सुनील इंदुवामन ठाकरे,अमरावतीः बंदुकीचा ‘ठाय’ आवाज झाला. तो पक्षी खाली पडला. दहा वर्षांचा सलीम त्या पाखराजवळ गेला. पाखरू हातात घेऊन न्याहाळलं. ती चिमणी नव्हती. त्या पाखराच्या गळ्याावर सोनेरी पट्टा होता. सलीम आपल्या मामांकडे गेला. त्या पक्षाबद्दल विचारलं. मामा अमिरूद्दीन तैय्यबजी हे शिकारी होते. त्यांना अनेक पक्षांबद्दल आणि प्राण्यांबद्दल माहिती होती.
आपणही मामांप्रमाणे शिकारी व्हावं असं सलीमला वाटायचं. मामांनी त्याला एक छर्ऱ्यांची बंदूकही भेट दिली होती. मामांकडे येणाऱ्या पशू, पक्षांची आणि शिकारीची नियतकालिक सलीम वाचायचा. मामांनी सलीमला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये एक पत्र देऊन पाठवलं. तिथे सलीम डब्ल्यू. एस. मिलार्ड यांना भेटला. मिलार्ड यांनी त्याला सोसायटीमधल्या कितीतरी पक्षी दाखवलेत. छोटासा सलीम आश्चर्यचकित झाला. पक्षांचं विश्व किती मोठं असेल याचं त्याला कुतूहल वाटलं.
हा छोटासा सलीम मोइजुद्दीन अब्दूल अली पुढे चालून मोठा पक्षितज्ज्ञ झाला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव झालं. डॉ. सलीम अली यांनी पक्षांचं विश्व अभ्यासक आणि तज्ज्ञांसह सर्वसामान्यांसाठी खुलं केलं. त्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया अशी ओळखदेखील मिळाली. 12 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन. मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबर हा जन्मदिन. शासनस्तरावर 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत पक्षिसप्ताह साजरा करण्यात येतो.
यलो थ्रोटेड स्पॅरो, चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया अर्थात पीतकंठी रानचिमणी त्यांच्या पुढ्याात पडली. आणि ते कुतूहलापोटी पक्षांच्या प्रेमात पडले. त्यांच्या आत्मचरित्राचं नावदेखील ‘द फॉल ऑफ अ स्पॅरो’आहे. तो पक्षी पडला आणि सलीम अली पक्षिविश्वात उंच उड्डाण केले. अलीकडच्या काळात 2014मध्ये पक्षिअभ्यासक आणि छायाचित्रकार मनोज बिंड यांनी अमरातवीच्या छत्री तलाव परिसरात हा पक्षी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
आपल्या नऊ भावंडांत सर्वात लहान सलीम. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1896 ला मुंबईत झाला.लहानपणीच आई-वडील गेलेत. त्यांच्या मामांनी त्यांना अत्यंत प्रेमाने वाढवलं. मामांनी त्याचे सर्व लाड कौतुक केले. त्याच्या जिज्ञासू वृत्तीतून येणाऱ्या शक्य तेवढ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. छोटा सलीम नियमित बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत जायला लागला. त्याला पक्षांच्या बॉडीचं जतन कसं करायचं हे तिथे शिकायला मिळालं. शालेय जीवनात ते सामान्यच होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईतच झालं.
पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजला प्रवेश घेतला. त्यातही गणित हा विषय त्यांना फार अवघड जायचा. 1913 ते मुुंबई विद्यापीठातून मॅट्रीकची परीक्षा पास झालेत. काही कारणांमुळे ते आपल्या मोठ्याा भावाकडे बर्मा येथे गेेलेत. त्यांची व्यवसायात मदत होईल असे भावाला वाटले. कामानिमित्त त्यांचं जंगलात भ्रमण व्हायचं. पक्षी, पर्यावरण आणि निसर्गाचं त्यांचं सूक्ष्म निरीक्षण सुरूच होतं. नंतर 1917मध्ये ते पुन्हा भारतात आलेत. मुंबईच्या दावर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्यांनी शिक्षण सुरू केले.
मुळात सलीम यांचा इंटरेस्ट पक्षांमध्ये होता. ही बाब फादर एथेलबर्ट यांच्या लक्षात आली. त्यांनीच सलीम यांना प्राणीशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले. ते मग कॉलेजमध्येच प्राणीशास्त्राचे क्लास अटेण्ड करू लागलेत.त्या काळातल्या प्रिंस ऑफ वेल्स म्युझियममध्ये त्यांना गाईड लेक्चररम्हणून नोकरी लागली. नात्यातल्याच तेहमिनासोबत त्यांचं लग्न झालं. त्यांना आपण बांधले गेलो असं वाटायला लागलं. पक्षांवर काम करावं असं त्यांना वाटायचं. ते जर्मनीच्या बर्लीन विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी प्रोफेसर इरवीन स्ट्रेसमन यांच्या मार्गदर्षनात बरंच अध्ययनकार्य केलं.
जर्मनीवरून परतले तोपर्यंत त्यांची नोकरी गेली. त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मदत केली. 1930मध्ये ते अलीबागजवळील किहीम येथे आलेत. तेथे त्यांनी बया म्हणजेच सुगरण गटातील पक्षाचा अभ्यास सुरू केला. पक्षांच्या डेडबॉडीजपेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण आणि अभ्यास यावर त्यांचा भर होता. पक्षां त्यांचा भूगोल आणि पर्यावरणाच्याही अंगाने अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटत असे. एक वेळ माणसांअभावी पक्षी जगतील; मात्र पक्षांअभावी माणसं जगणं शक्यच नाही. या विधानावर ते ठाम होते. शेतीच्याही अंगांनी ते पक्षांचा विचार करायचे.
दुर्बीण, कॅमेरा, छोटीशी डायरी आणि पेन्सिलीसह त्यांचा पक्षिनिरीक्षणाचा प्रवास सुरू झाला. 1930ते 1955 दरम्यान जवळपास संपूर्ण भारतभर त्यांनी विविध पक्षांचा अभ्यास केला. 1924-25 या काळात त्यांनी लेखनास आरंभ केला. मुगलकाळातील साहित्यातील पक्षी आणि वन्यजीव यांवर त्यांनी लेखन केले. ‘द बूक ऑफ इंडियन बर्डस’, ‘हॅण्डबूक ऑफ बर्डस ऑफ इंडिया अॅण्ड पाकिस्तान’ सारख्या अनेक ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं. त्यांचं ‘द फॉल ऑफ अ स्पॅरो’ हे आत्मचरित्र तर जगप्रसिद्धच आहे. अनेक पक्षिअभ्यासकांना आजही तो उपयुक्त आहे.
विविध संस्थानिकांच्या मदतीने पक्षिनिरीक्षणाच्या मोहिमी आखल्यात. त्यांनी केवळ पक्षांचे अध्ययन किंवा निरीक्षण केले नाही. त्यासोबतच निसर्ग आणि पर्यावरणासाठीही मोलाचे कार्य केले. निसर्ग संरक्षण चळवळ त्यांनीच भारतात सुरू केली. असं राजहंस प्रकाशित ‘डॉ. सालीम अली’ या पुस्तकात लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिलं आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे अनेक पक्षी अभयारण्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याततून देशाच्या स्वातंत्र्यानंतर पर्यावरण खातं आलं. पक्षी आणि पर्यावरणाच्या या कार्यात पंडित जवाहरलाल नेहरूंची मदत झाली. इंडिया बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ या संस्थेची 1953ला स्थापना झाली. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
डॉ. सलीम अली यांना त्यांच्या कार्यासाठी 1958मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनतर 1976मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. याच वर्षी नोबेलतुल्य समजलं जाणारं अमेरिकेचं पॉल गेट्टी पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं. ब्रिटीश ऑर्निथोलॉजिस्ट (पक्षितज्ज्ञ) युनियनने 1967मध्ये सुवर्णपदक बहाल केले. असे पदक मिळवणारे ते पहिले गैरब्रिटीश नागरिक होते.
1969 मध्ये आंतराष्ट्रीय स्तरावरचं जॉन सी फिलिप्स स्मारक पदक प्रदान करण्यात आलं.यू. एस. एस. आर अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसने त्यांना 1973मध्ये पावलोवस्की शताब्दी स्मृतिपदकाने सन्मानित केले. ते राज्यसभेचे सदस्यदेखील राहिलेत. 1990मध्ये डॉ. सलीम अली यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने कोयंबतूर जवळ पक्षिविज्ञानाशी संबंधित केंद्र सुरू झाले. काही पक्षांच्या उपजातींना चक्क ‘सालिमाली’ हे नाव प्रदान करण्यात आलं. त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय पक्षी दिवस’म्हणून साजरा केला जातो.
डॉ. सलीम यांच्या परिवारातील काही सदस्य स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. त्यांनीदेखील पक्षांसाठी जणू एक मोठी चळवळच उभी केली. वयाच्या नव्वदीत गेले तरी त्यांची शिस्त आणि काटकवृत्ती कायम होती. सामान्य लोकांपर्यंत पक्षिषास्त्र आणि पक्षांची माहिती पोहचवण्याचा त्यांचा अखेरपर्यंत प्रयत्न राहिला. सोप्या भाषेत; परतु शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी आपल्या लेखनातून दिली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची त्यांच्या आयुष्यात खूप मोठी भूमिका राहिली. स्वातंत्र्यानंतर ते त्याचे प्रमुख झालेत. त्यांच्या प्रेरणेतून अनेक नवे पक्षिनिरीक्षक अभ्यास पुढे आलेत. पक्षांना इजा न करता पकडण्याच्या जवळपास 100 पद्धती त्यांनी विकसित केल्यात.
शेवटच्या श्वासांपर्यंत त्यांचा जीव पक्षांमध्येच गुंतलेला होता. त्यांना पक्षांसोबत बोलता येतं, त्यांची भाषा समजतं असंही काहीजण मानायला लागलेत. सामान्यजनांना नव्या पिढीला काही ना काही देण्याचा त्यांचा सातत्याने ध्यास राहिला. नव्वदी उलटली होती. आजाराने त्यांना ग्रासलं. अखेर 10 जून 1987 रोजी त्यांचे प्राण‘पक्षी’ अनंतात विलीन झाले. ते लहान असताना त्यांच्या समोर ‘द फॉल ऑफ अ स्पॅरो’ हा प्रसंग घडला. अर्थात ‘ती चिमणी’ त्यांच्या पुढ्याात पडली. शिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा छोटासा सलीम पुढे खूप मोठा आंतरराष्टीय स्तरावराचा पक्षितज्ज्ञ झाला. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] […]