दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शनीचा आज शेवटचा दिवस
वणीतील नगर वाचनालयात दिवाळी अंक आणि नवीन ग्रंथांचे प्रदर्शन
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नगर वाचनालयात दिवाळी अंकांचे आणि नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन सुरू झाले. हे प्रदर्शन केवळ 23 आणि 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. या प्रदर्शनीत 40 दिवाळी अंक आणि नवे 200 ग्रंथ आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व सार्वजनिक वाचनालय बंद होती. त्यानंतर सुरू झालेल्या वाचनालयात वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे. वाचकांना साहित्याची मेजवानी मिळावी, यासाठी दि. 23 नोव्हेंबरला प्रदर्शन सुरू झाले.
या प्रदर्शनीचे उद्घाटन या वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी केले. याप्रसंगी वाचनालयाचे सचिव गजानन कासावार, हरिहर भागवत, अनिल जयस्वाल, प्राची पाथ्रडकर, अर्जुन उरकुडे, राजाभाऊ पाथ्रडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दर्जेदार 40 दिवाळी अंक वाचकांना केवळ 200 रुपये वर्गणी भरून वर्षभर वाचायला मिळणार आहेत. त्यासोबत वाचनालयासाठी नवीन कादंबऱ्या, वैचारिक, ललित, विनोदी अशा सर्व प्रकारातील ग्रंथाची खरेदी करण्यात आली आहे. वाचकांना चाळण्यासाठी जवळपास 200 ग्रंथाचीसुद्धा प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून नगर वाचनालयाचा हा उपक्रम सुरू आहे. वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम घेतलेत. वाचनस्पर्धा, अंकांवर परीक्षण किंवा लेख लिहिणे आदी स्पर्धादेखील व्हायच्यात. लोकांनी वाचनाकडे वळावं यासाठी निरंतर उपक्रम सुरूच असतात. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीचा वाचकांनी लाभ घेण्याची विनंती नगर वाचनालयातर्फे करण्यात आली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी