जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….
भूमी अभिलेख विभागाविरोधात उद्यापासून उपोषणाला बसणार
विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद घरकूल योजनेंतर्गत १४८२ घरकुल मंजूर झाले आहे. नगर परिषदेने त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. परंतु जागेची मोजणी करून नमुना ८ अ तयार करण्याचे पुढील काम करण्यास भूमी अभिलेख विभाग टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ७ डिसेंबरला दुपारी १२ वाजतापासून नगराध्यक्ष व नगरसेवक उपोषणाला बसणार आहे.
नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शनिवारी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी आ. संजीवरेड़ी बोदकुरवार यांनी या उपोषणाला समर्थन जाहीर केले. नगर परिषदेने स्वमालकीच्या जागेवर १८९ घरकुलं दिली आहेत. तसेच घरकूल योजनेंतर्गत २५ जून २०१८ रोजी १४८२ घरकुल मंजूर केले आहेत.
परंतु पुढील कार्यात भूमी अभिलेख विभाग सहकार्य करीत नसल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दुर्लक्षामुळे नगर परिषद घरकूल लाभार्थ्यांना लाभ देण्यास असमर्थ ठरत आहे. २०११च्या शासन निर्णयानुसार नझूलच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना पट्टे द्यायचे असल्यास याची कारवाई नगर परिषद मुख्याधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईने करून देऊ शकते.
या प्रक्रियेत नगर परिषदेने लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, डीपीआर मंजूर करणे हे काम केले आहे. पुढील काम म्हणजे जागेची मोजणी करणे, जागेचा ८ अ तयार करणे हे भूमी अभिलेख विभागाचे आहे. परंतु भूमी अभिलेख विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने. घरकुल लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळत नाही आहे. याबाबत नगर परिषदने वारंवार भूमी अभिलेख विभागाशी पत्र व्यवहार केला. परंतु उत्तर मिळाले नाही.
या सर्व प्रकारात नगराध्यक्ष व नगरसेवक यांना जनतेच्या रोषाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे या भूमी अभिलेख विभागाच्या विरोधात नगराध्यक्ष व नगरसेवक आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.
घरकूल योजना मंजूर असणाऱ्यांची मोजणी करावी, सर्व नझूल धारकांना ८ अ देण्यात यावे, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना नियमानुसार. स्वमालकीची जांगा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शालीक उरकुडे, प्रशांत निमकर, पांडुरंग टोंगे, सुभाष वाघाळकर, विजय मेश्राम, चंद्रकांत फेरवानी, रंजू झाडे, प्रीती बिडकर, स्वाती खरबडे, संगीता भंडारी, अक्षता, चौहाण आदी उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा