मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद

बंदला विविध पक्षांनी पाठिंबा देण्याचे आवाहन

1

जब्बार चीनी, वणी: सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

वणीतही विविध शेतकरी संघटनेतर्फे बंदचे आवाहन करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या बंदमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनीही पाठिंबा देत सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भारतभरातून पाठिंबा मिळत आहे. विदर्भातून राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीमदेखील दिल्लीकरिता रवाना झाली आहे. देशातील 500 हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदमध्ये शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.

 

 सेना,  राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा 

हाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद व्हावा यासाठी शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे असे आवाहन किसान सभा व समविचारी संघटना करत आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या बंदला समर्थन द्यावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप विरहित पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत शेतकऱ्यांची ठाम बाजू घेतली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनीही भारत बंदच्या दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

या आंदोलनाची केवळ भारतच नव्हे तर आता जगभरात दखल घेतली जात आहे. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्या दिवशी वणी बंद यशस्वी करण्यासाठी किसान सभा व समविचारी संघटनांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे असे आवाहन किसान सभेने केले आहे.

कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मौहरमपुरी, कॉ. अँड. दिलीप परचाके, कॉ.अँड.विप्लव तेलतुम्बडे, कॉ. मनोज काळे, कॉ. शिवा बांदुरकर आदींनी या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

हेदेखील वाचा

शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

Leave A Reply

Your email address will not be published.