खातेरा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग
ऍट्रोसिटी, पोस्कोसह विविध गुन्हे दाखल, आरोपीस अटक, कारागृहात रवानगी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने विविध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस कारागृहात रवाना केले.
7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खातेरा येथील पीडित मुलीचे आई वडील शेतात कापूस वेचण्याकरिता गेले. घरासमोरील मंडपात वेचलेल्या कापसाची गंजी मारून होती. त्या गंजीकडे लक्ष देशील असे मुलीला सांगून दोघेही शेतात निघून गेले गेले. पीडित मुलगी एकटीच घरी असल्याने गंजीजवळ खाट टाकून झोपून कापसाच्या गंजीकडे लक्ष देऊन होती.
सुमारे 12.30 वाजताच्या दरम्यान मुलीचा डोळा लागला. 12.45 वाजता गावातीलच बंडू बाबाराव जुनघरे (40) हा घराला वॉलकंपाउंड नसल्याने सरळ खाटेजवळ आला. मुलगी एकटी पाहून बंडू याने मुलीशी अश्लिल चाळे करू लागला. तेवढ्यात मुलीची झोप उघडली व काका तुम्ही असे काय करता म्हणून आरडाओरड केली.
बंडू तिथून पळून गेला. त्यानंतर मुलगी रडत बसली व थोड्याच वेळात बंडू पुन्हा आला. घडलेली घटना आई वडील किंवा पोलिसांना सांगितली तर ठार मारेन, अशी धमकी दिली. शिवीगाळ करून निघून गेला. सायंकाळी 4 वाजता मुलीचे आई-वडील कापसाचे गाठोडे घेऊन शेतातून घरी आले. तरी मुलगी रडत होती.
आईने मुलीला विचारले, का बरं रडत आहे. मुलीने घडलेली हकिकत सांगितली. मुलीच्या आईने आपल्या बहिणीला बोलावून ही घटना सांगितली. आई, वडील व मुलीची मावशी मिळून सायंकाळी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
यावरून पोलिसांनी कलम 354,अ (1)354, 448, 504, 506 व 8 बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतीबंधक (अॅट्रॉसिटी) अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेत.
आरोपीला त्वरित अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी बंडू याची कारागृहात रवानगी केली. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार आणि ठाणेदार धर्मा सोनुने करीत आहेत.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा