झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर
मुकुटबन, पाटण, अडेगाव, अर्धवन व मांगली गावाकडे सर्वांचे लक्ष
सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील काही गावे आजी माजी लोकप्रतिनिधींची गावे आहेत. दत्तक घेतलेले गाव तसेच एकाच गटात दोन गट पडलेले गाव आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर कोण बाजी मारतो याकडे जनतेचे विशेष लक्ष लागले आहे.
मुकुटबन तालुक्यातील १५ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. सिमेंट फॅक्टरीमुळे गावाच्या विकासाचा मोठा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व गावपुढारी आपलाच सरपंच व्हावा याकरिता मोर्चेबांधणी करीत आहेत.
मुकुटबन येथे ५ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात ३ उमेदवार असे ५ वॉर्डात १५ सदस्य निवडून द्यायचे आहेत. १५ सदस्यांकरिता गावात तीन गट निर्माण झालेत. तीन गट मिळून ४४ व अपक्ष २ असे एकूण ४६ उमेदवार रिंगणात उभे आहेत.
गावातील जनता गावाचा विकास करणारा सदस्य शोधून मत मारणार असल्याची चर्चा करीत आहे. ३५ वर्षांत गावाचा विकास कुणी केला व कुणी नाही केला हे जनतेला माहीत असल्याने ग्रामवासी योग्य उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे अनेकांची आपल्या गटातील सरपंच व्हावा याकरिता धडपड सुरू आहे. परंतु एकही सदस्य गावातील विकासकामाबद्दल प्रचार करताना दिसत नाही. समाज व जातीवरच्या मतदारांवर राजकारणाचे समीकरण जोडले जात आहे.
पाटण येथे ४ वॉर्ड असून ११ सदस्यांकरिता तीन गट निर्माण झाले आहेत. तीन गटांचे ३३ व अपक्ष १ असे ३४ उमेदवार निवडणुकीचे उभे आहेत. एकाच गटात दोन गट पडल्याने तेथील निवडणूक रंगतदार राहणार आहे.
अडेगाव एका लोकप्रतिनिधींचे दत्तक गाव असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत २ गट असून एक अपक्ष उमेदवार उभा झाला आहे. गावात ४ वॉर्ड असून २२ दोन गटातील तर एक अपक्ष असे २३ सदस्य उभे आहे.
मांगली येथे ३ वॉर्ड असून दोन गट आहेत. दोन गटांचे १८ तर ४ अपक्ष असे एकूण २२ उमेदवार उभे असून एकाच घरातील ४ सदस्य निवडणूक रिंगणात उभे आहे. निवडणुकीत एक पक्षातील पुढाऱ्याला दूर करून त्याला एकटे पाडल्याचे दिसत आहे.
तसेच एकाच घरातील चार सदस्य उभे केल्याने निवडणुकीत वेगळे वळण तर येणार नाही ना असा निष्कर्ष काढला जात आहे. तर अर्धवन एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचे गाव आहे. गावात दोन गट असून ३ वॉर्डाकरिता ७ उमेदवार निवडून आणायचे आहे.
दोन्ही गट मिळून १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. वरील गावातील सर्व गावपुढारी व लोकप्रतिनिधी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आहेत. ग्रामपंचायत ताब्यात घेण्याकरिता मतदारांना विविध प्रलोभने व आश्वासनाची खैरात वाटताना दिसत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा