तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला माईन्स येथे रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करत रायफल हिसकावून पळविल्याची घटना दि. 20 बुधवारी रात्री घडली. यावेळी चोरट्यांनी एका रायफलसह राऊंड बॅग लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी सुरक्षारक्षक रामकीसन उदय यादव यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली.
वणी तालुक्यातील शिंदोला येथे सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्या मालाचे उत्खनन केले जाते. यासाठी परमडोह, गोवारी पार्डी, चनाखा आदी ठिकाणी दगडाच्या खाणीची निर्मिती करण्यात आली. कंपनीच्या दारूगोळ्यासह इतर साधनांचे रक्षण करण्यासाठी कंपनीत ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यात येतात. बुधवारी रात्रपाळीत रामकीसन उदय यादव (43) आणि इरफान सिकंदर शाह (35) हे दोघे शिंदोला परिसरातील खाणी लगत कर्तव्यावर होते.
रामकीसन टॉवरवर होता तर इरफान खाणं परिसरात होता. बुधवारी रात्री बारा साडे – बारा वाजताच्या दरम्यान तीन चोरटे खाणं परिसरात आले. यावेळी चोरट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले होते. चोरट्यांनी अचानक इरफान शाहवर हल्ला करून मारहाण केली. नंतर टॉवरवर चढून रामकीसनलाही मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी रामकीसन जवळील रायफल आणि राऊंड बॅग हिसकावून नेली.
रामकीसन यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञान चोरट्यांविरुद्ध भा. दं. वि. 394, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
हे देखील वाचा: