संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी
फीससाठी सतत कॉल करून दबाव टाकण्याचा आरोप
जितेंद्र कोठारी, वणी: पालकांवर फीससाठी सारखा दबाव टाकल्याने संतप्त पालकांनी आज वांजरी रोडवरील स्वर्णलीला शाळेवर धडक दिली. गेल्या काही महिन्यांपासून कोरनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. याची जाणीव शाळेला असतानाही अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापन पालकांना फीससाठी सारखे कॉल करून दबाव टाकत आहे असा आरोप पालकांचा आहे. अखेर आज सोमवारी दिनांक 22 मार्च रोजी पालकांनी शाळेवर धडक देत शालेय शैक्षिणिक फीमध्ये पन्नास टक्के कपात करावी व शाळेत NCERT ची पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले. सुमारे शंभर ते सव्वाशे पालक यावेळी उपस्थित होते. याप्रकरणी बुधवारी पुन्हा पालक आणि शाळेमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे.
कोरोनामुळे सर्वच नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या शैक्षणिक सत्रापासून प्रत्यक्ष शाळा सुरु नसूनही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. असे असताना देखील शाळा पूर्ण फी भरण्यासाठी पालकांवर सक्ती करत आहे. आधीच कोरोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती ठिक नसताना शाळा व्यवस्थापन खासगी प्रकाशनाची महागडी पुस्तके विकत घेण्याच्या आग्रह करीत आहे. त्यामुळेही पालकांवर अनावश्यक आर्थिक भार पडतो. त्यामुळे खासगी प्रकाशनाऐवजी NCERT ची पुस्तके शाळेत उपलब्ध करून द्यावी. अशीही मागणी पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या काळात शाळेकडून सहकार्याची अपेक्षा: अभिजित दरेकर
सध्या शाळा बंद असल्यामुळे प्रयोगशाळा, भोजन वाहतूक, देखभाल दुरुस्ती असे अनेक खर्च वाचला आहेत. त्यातच शाळेने काही शिक्षकांची कोरोनामुळे हकालपट्टी केली आहे. संपूर्ण विषयाचे ऑनलाईन वर्गही होत नाही त्यामुळे मग त्यासाठी पैसे का द्यायचे ? शाळा, शिक्षक व कर्मचारी असा होणारा शैक्षणिक खर्च वगळता इतर खर्च शाळा व्यवस्थापनाचा वाचला आहे. त्यामुळे 50 टक्के फी माफीच्या प्रस्तावात काहीही गैर नाही. शहरातील इतर शाळा ही पालकांना फीसमध्ये सवलत देत आहे. फीससाठी पालकांना सारखा कॉल करणे चुकीचे आहे. आजपर्यंत आम्ही शाळेला सहकार्य केलं आहे. आता शाळेकडून सहकार्याची अपेक्षा आहे. शासनानेही पालकांवर दबाव टाकू नये अशी विनंती केली आहे.
-अभिजीत राम दरेकर : पालक
निवेदन देताना शहरातील तब्बल 150 पालक शाळेत उपस्थित होते. तसेच निवेदनाची प्रत शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक पुणे, शिक्षण उपसंचालक अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, शिक्षणाधिकारी यवतमाळ व गट शिक्षणाधिकारी वणी यांना पोस्टाने पाठवण्यात आली आहे.
हे देखील वाचा: