लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू
लेखी आदेश नाही, मात्र वाढत्या उन्हामुळे मौखिक सूचना
जितेंद्र कोठारी, वणी: एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची तयारी असताना तालुक्यात मात्र दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारपासून दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू आहेत. तर बार मात्र 5 वाजेपर्यंतच सुरू आहेत. दरम्यान बाजारपेठेबाबत असा कोणताही लेखी आदेश नसल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आल्याने हा लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल’ ठरतोय.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी रात्रीच्या संचारबंदीसह दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचे आदेश काढले होते. विशेष म्हणजे यात दुकानाच्या वेळेत बदल करण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बुधवार सायंकाळी पर्यंत कोणतेही लेखी आदेश काढण्यात आले नसल्याची माहिती आहे. प्रशासनातर्फेसुद्दा या संदर्भात कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आली नाही.
यवतमाळचे नवीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दि . 28.03.2021 चे जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक/गृहशाखा/डेस्क 12/ कावि/384/2021 मध्ये दुकानाच्या वेळेबाबत कुठेही उल्लेख करण्यात आलेले नाही. दुकानाच्या वेळेतील घोळबद्दल उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना विचारणा केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मौखिक सूचना असल्याची माहिती त्यांनी दिली.
उन्हामुळे वेळेत बदल करण्याची मागणी: संदीप माकोडे
मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असल्यामुळे दुकानांची वेळ सायंकाळी 5 च्या जागी रात्री 8 वाजेपर्यंत करण्याची व्यापारी संघटनांची मागणी होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने दुकानांच्या वेळेत बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती आहे. दुकानांच्या वेळेत वाढ करण्याबाबत सद्यतरी लेखी आदेश मिळालेले नाही.
– संदीप माकोडे: मुख्याधिकारी न.प. वणी
लॉकडाऊनमुळे सध्या व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच बाजारपेठेचा वेळ कमी असल्याने व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय बाजारपेठेचा वेळ देखील कमी असल्याने एकाच वेळी दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा वेळ कमी करून बाजारपेठे सुरू ठेवण्यास अधिक वेळ द्यावा अशी मागणी व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान वेळेत बदल झाल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
हे देखील वाचा:
विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक