जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात आपले जीव धोक्यात टाकून पत्रकारिता करणाऱ्या 45 वर्षावरील पत्रकारांना कोविड योद्धा प्रमाणे प्रामुख्याने कोरोना लसीकरण करण्यात यावे याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशा प्रकारची अधिसूचना शनिवार 4 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ कडून निर्गमित करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळात बातम्या संकलन करिता रुग्णालय तसेच प्रतिबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधी, पत्रकार, बातमीदार, प्रेस फोटोग्राफर यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पत्रकारांना कोविड योद्धाप्रमाणे प्रामुख्याने लस देण्यात यावे. अशी पत्रकार संघटनांची मागणी होती.
जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार वणी तालुक्यातील पत्रकारांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी 45 वर्षावरील सर्व पत्रकार बांधवांनी मुख्याधिकारी न.प. वणी यांच्याकडे आपले नाव नोंदवावे. असे आव्हान मुख्याधिकारी संदीप माकोडे यांनी केले आहे.
हे देखील वाचा: