जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आतापर्यंत फक्त 9 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिक व व्यापारीवर्गासह हजारो शासकीय कर्मचारी प्रतीक्षा यादीत आहे. खेदाची बाब म्हणजे अनेक फ्रंट लाईन वर्कर अद्यापही कोरोना लसीकरण पासून वंचित आहे. दुकानदारांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी 9 एप्रिल पर्यंत कोरोना लस न घेतल्यास दररोज एक हजार रुपये दंडाच्या भीतीने शेकडो कर्मचारी लस घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी करीत आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयाला 24 मार्च पर्यंत 5760 डोज कोविशिल्ड लस मिळाले होते. त्यानंतर 30 मार्च रोजी कोवेक्सीन लसीचे 500 डोज मिळाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अथक प्रयत्नाने दि. 4 एप्रिल रोजी वणी तालुक्यासाठी 3000 डोज कोविशिल्ड लसीचे मिळाले. एकूण 9260 डोज पैकी 1600 डोज ग्रामीण भागात पाठविण्यात आले. तर वणी ग्रामीण रुग्णालयात 7660 लोकांचे लसीकरण करण्यात आले.
गुरुवार दि.8 एप्रिल रोजी शिल्लक असलेले 211 डोज संपल्यावर नियमित लसीकरण बंद करण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाकडे लस पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परन्तु सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात कोरोना लसीचा तुटवडा पाहता लसीकरणासाठी नागरिकांना काही दिवस वाट पहावी लागणार आहे. आरोग्य विभागाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे.
वणी बहुगुणी हे देखील वाचा:
धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ