ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी
अडेगाव येथील गावकऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली अडेगाव येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधांच्या विरोधात कामे करीत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.
अडेगाव ग्रामपंचायत ची बॉडी ११ सदस्यांची असून त्यात तीन वेगळे गट पडले. ४ सदस्य असलेल्या गटातून ईश्वरचिठ्ठीवर सरपंच म्हणून सीमा लालसरे ह्या विराजमान झाल्यात.
२२ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच यांची निवड झाली. ५ मार्चला मासिक सभा आयोजित करण्यात आली. सभेत ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज, आवश्यक असलेले मुद्दे म्हणजे खाते बदल व आवश्यक खर्चास मंजुरी मिळेबाबत चर्चा करण्यात आली. या ठरावाला सात सदस्यांनी नामंजूर केले. तर चार सदस्यांनी मंजुरी दर्शविली.
५ एप्रिल रोज पुन्हा मासिक सभा घेण्यात आली. सचिव यांनी विषयांकित बाबीबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या पोट कलम ३८,३९ बाबत वाचन करून सविस्तर सांगितले. तरीपण खर्चाच्या मंजुरीस ७/४ ने नामंजूर केले. त्यामुळे गावातील दैनंदिन कामकाज म्हणजेच पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल, दुरुस्ती करणे, गावातील पथदिवे लावणे,आरोग्यविषक कार्य करणे या सर्व गोष्टीवर आर्थिक व्यवहार करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.
जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहे. ग्रावासीयांना वीज, पाणी यांसह कोरोनाच्या महामारीत सैनिटायजर व मास्क खरेदी करून वाटप करणे आवश्यक असताना प्रत्येक ठराव विरोधातील ७ ग्रामपंचायत सदस्य विरोध करून जनतेला वेशीवर धरत आहे. तर ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांपासून जाणीवपूर्वक दूर ठेऊन आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या पोटकलम ३८,३९ अंतर्गत सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यांनी ग्रावासीयांच्या मूलभूत गरजेच्या कामाला मान्यता न दिल्यास त्यांचे पद रद्द करण्याचे प्रावधान असून अडेगावातील सातही ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास व जनतेच्या मूलभूत गरजांचा विरोध करीत आहे. तरी विरोध करणाऱ्या सातही सदस्यांचे पद रद्द करण्याची तसेेेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही मागणीवजा तक्रार उपविभागीय आयुक्त अमरावती तथा जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे राहुल पाचभाई, गणेश पेटकर, संजय आत्राम, धनंजय पाचभाई, किशोर जगताप, राहुल ठाकूर, जगदीश चांदेकर, वामन जगताप, दत्ता पेटकर, लक्ष्मण केळझरकर, खुशाल पारखी, मंगेश पाचभाई, दत्ता लालसरे, सतीश पारखी, गणेश आत्राम, विजय लालसरे व गणेश पाचभाई यांनी केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा