50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी

मनसेच्या चिता आंदोलनाचा इशारा व पत्राची दखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे उप जिल्हा रुग्णालयाची निर्मिती तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) कार्यान्वित करणे करीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केलेले आमरण उपोषण आंदोलन व चिता आंदोलनाच्या इशाराची शासनाने दखल घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दि.19 एप्रिल रोजी पत्र पाठवून वणी येथील ट्रामा केअर युनिट इमारतीत 50 खाटांचे ऑक्सिजन युक्त डिसीएचसी सेंटर तात्काळ कार्यान्वीत करीत असलेबाबत सूचना दिली आहे. मनसेच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील गोर गरीब कोरोना रुग्णांना वणी येथे उपचार करणे शक्य होणार आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी  शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या प्रयत्नातून 50 खाटांचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याचा दावा केला होता. आज याबाबत राजू उंबरकर यांनी फेसबुकवरून पत्र दाखवत त्यांच्या आंदोलनाच्या इशा-यामुळे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून 50 खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या श्रेयावरून चाललेल्या राजकारणाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळातही भाजप रुग्णांच्या जीवावर राजकारण  करीत असल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केला आहे.

शासन स्तरावरून मंजूर झालेते उप जिल्हा रुग्णालय तसेच कोरोना रुग्णांसाठी डेडिकेटेड केअर सेंटर सुरू करावे. या मागणीला घेऊन राजू उंबरकर यांनी 5 ऑक्टो. 2020 रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मनसेच्या आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य विभागाने सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आंदोलनाला सहा महिने उलटूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

त्यामुळे राजू उंबरकर यांनी दि. 17 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ तसेच मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना स्मरण पत्र पाठवून आश्वासनाची पूर्तता न केल्यास तालुका व जिल्हा स्तरावर आरोग्य विभाग कार्यालयासमोर चिता आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या चिता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी 19 एप्रिल रोजी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना पत्र पाठवून ट्रामा केअर इमारतीत 50 खाटांचे ऑक्सिजन युक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) तात्काळ कार्यान्वित करीत असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे.

कोरोना रुग्णांच्या जीवावर राजकारण सुरु
वणी येथे सर्व सुविधायुक्त कोविड उपचार केंद्र तसेच विलगिकरण कक्ष सुरु होण्याआधीच श्रेय घेण्याची होड सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदाराच्या प्रयत्नामुळे वणी येथे डिसीएचसी केंद्र सुरु होणार असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना पाठविलेल्या पत्रानुसार मनसेच्या आंदोलनाची दखल घेऊन वणी येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कोरोना सारख्या महाभयंकर काळातही भाजप रुग्णांच्या जीवावर राजकारण करीत असल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.