विवेक तोटेवार, वणी: आज शहरात दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेतील एक व्यक्ती देशमुखवाडी येथील रहिवाशी असून दुसरी व्यक्ती जैताई नगर येथील आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारूचे दुकान बंद असल्याने ते गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सॅनिटायझर पित असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी दोघांचा मृ्त्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुनील महादेव ढेंगळे (36) हा देशमुखवाडी येथे त्याच्या पत्नीसह राहत होता. तो एका ट्रॅक्टरवर मजुरी करायचा. तर गणेश उत्तम शेलार (40) हा बस स्थानकाच्या बाजुला जैताई नगर येथील रहिवाशी होता. तो हातीगाडी चालवून आपला उदरनिर्वाह करायचा. लॉकडाऊनमुळे सध्या दारुची विक्री बंद आहे. तसेच अवैधरित्या दारुचा दर तिप्पट ते चौप्पट आहे. त्यामुळे ते तीन चार दिवसांपासून सॅनिटायझर पित असल्याची माहिती आहे.
गणेश उत्तम शेलार यांची आज प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावरून गणेशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दुस-या घटनेत सुनील ढेंगळे या तरुणाची सॅनिटायझर पिल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दीड ते दोन तासांमध्येच उपचारादरम्यास त्याचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ व आई असा आप्तपरिवार आहे. तर गणेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा आप्तपरिवार आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’