पिकावर गोणी झाकताना अंगावर वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू
वेडद येथील घटना, मुकुटबन परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाडगे (50) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी 3 वाजेपासूनच मुकुटबन परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.
मृतक दिलीप गाडगे हे वेडद येथील रहिवाशी होते. आज ते त्यांचे मित्र सतीश बोरकर यांच्या सोबत शेतात गेले होते. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले. पावसाची चाहूल लागताच दिलीप यांनी मुंग भिजू नये म्हणून त्यावर गोणी टाकून मुंग झाकायला सुरूवात केली तर त्यांचा मित्र सतीश हे सोयाबीन झाकत होते. मात्र त्याच वेळी अचानक वीज दिलीप यांच्या अंगावर पडली.
दरम्यान ही दुर्घटना झाल्याचे सतीश यांना माहितीच नव्हती. सोयाबीन झाकल्यावर सतीष हे दिलीप यांच्याजवळ गेले असता त्यांना दिलीप पडून दिसले व त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शेजारी व गावकऱ्यांना दिली.
दिलीप यांच्याकडे 16 एकर शेती आहे. मृत्यूची माहिती मुकुटबन पोलीस स्टेशनला देण्यात आली. ए.एस. आय खुशाल सुरपाम व जमादार प्रवीण तालकोकुलवार हे घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून देह शवविच्छेदन करीता झरी येथे पाठविण्यात आला. मृतक दिलीप यांच्या मागे पत्नी, 2 मुलं, विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. दिलिप यांच्या अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा: