नागेश रायपुरे, मारेगाव: गोंडबुरांडा-नरसाळा दरम्यान झालेल्या अपघातातील जखमीची आज सकाळी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. दिनांक 11 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वार व सुमोचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता.
समीर वासुदेव काकडे (27) हा तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवाशी होता. दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास समीर त्याच्या दुचाकीने गोंडबुरांडा येथे घरी जात होता. नरसाळ्या जवळ एका विरुद्ध दिशेने येणा-या सुमोचा व समीरच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.
त्याला जखमी अवस्थेत मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान आज दिनांक 15 जून रोजी सकाळी समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाची वार्ता गावात पोहोचताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. समीरच्या पश्चात आई, बहिण व दोन भाऊ आहे.
मुक्टा येथील शेतक-या उपचारादरम्यान मृत्यू
मुक्टा येथील शेतकरी शंकर गजानन कोंडेकार (25) या युवा शेतक-याने शनिवारी दिनांक 12 जून रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच शंकर यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा: