विवेक पिदूरकर, शिरपूर: वणीवरून गावी परत जाताना रस्त्यात दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेंढोली येथील शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. चारगाव चौकीजवळील पेट्रोल पम्पजवळ आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतीउपयोगी वस्तूंची खरेदी करून ते गावी परतत होते.
सविस्तर वृत्त असे की तुकाराम वामन बोंडे (52) हे मेंढोली येथील रहिवाशी होते. आज शुक्रवारी दिनांक 18 जून रोजी सकाळी ते शेतीचे साहित्य आणण्यासाठी त्यांच्या हिरो होन्डा या दुचाकीने (MH29 AG2118) वणीला गेले होते. शेती उपयोगी साहित्य व बाजार करून 3.30 वाजताच्या दरम्यान ते वणीहून मेंढोलीसाठी परत निघाले. दरम्यान चारगाव चौकी जवळील मालू पेट्रोल पम्प जवळ त्यांच्या दुचाकीसमोर एक बैल आडवा आला.
बैल आडवा आल्याने त्यांचे गाडीवरील संतुलन सुटले व ते दुचाकीवरून कोसळले. यात त्यांच्या डोक्याला भीषण मार लागला व अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदना करीता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
तुकाराम त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मेंढोली गावात शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा: