जितेंद्र कोठारी, वणी: कोविड 19 विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लागू केलेले निर्देशाचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, याबाबत तपासणी करून दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी वणी नगर परिषद अंतर्गत 3 पथक तयार करण्यात आले आहे. शहरातील सर्व 13 प्रभाग मध्ये शुक्रवार 25 जून रोजी पथक धडकणार असून मास्क, सोशल डिस्टनसिंग तसेच हँडवाश या त्रिसूत्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनावर तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशानुसार उप विभागीय अधिकारी वणी यांनी तीन पथकाचे गठन केले आहे. तहसीलदार शाम धनमने यांचे नेतृत्व असलेले पथक शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4 मध्ये, मुख्याधिकारी संदीप माकोडे यांचे नेतृत्वाखाली पथक प्रभाग क्रमांक 5 ते 10 तर उपविभागीय अभियंता सा.बां. विभाग तुषार परळीकर यांच्या नेतृत्वातील पथक प्रभाग क्रमांक 11 ते 13 मध्ये फिरणार आहे.
पथकाच्या तपासणीत सर्व प्रकारच्या दुकानातील मालक व कामगारांनी लसीकरण व कोविड चाचणी केली किंवा नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. दुकानातील मालक व कामगारांनी मास्क, सोशल डिस्टनसिंग व हँडवॉश या त्रिसूत्री नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास 5000 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. दुकानाच्या दर्शनीभागात ” नो मास्क, नो एन्ट्री” असे बोर्ड किंवा फ्लॅक्स लावण्यात आलेले आहे किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रभाग मधील कोणत्याही नागरिकांनी योग्य पद्धतीने मास्कचे वापर न केल्याचे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
शासनाला ‘डेल्टा प्लस व्हयरियन्ट’चा धसका
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराने (व्हेरिएन्टने) शासनाची झोप उडविली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘डेल्टा प्लस” या खतरनाक व्हयरियन्टचे आक्रमण होईल अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून लागू करण्यात आलेले निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची तयारीही राज्य शासनाने केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स मधून मिळत आहे.
हे देखील वाचा:
प्रतिबंधीत तंबाखूची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक