जितेंद्र कोठारी, वणी: साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात यावर्षी शतकोत्सव साजरा करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांची अध्यक्षपदी, राज्यशासन पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन कासावार यांची उपाध्यक्षपदी, प्राध्यापक डॉ. अभिजित अणे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर पुनश्च एकवार एक मताने निवडण्यात आले आहे.
कवी राजेश महाकुलकार यांची सहसचिवपदी, राजाभाऊ पाथ्रटकर यांची कार्यक्रम प्रमुख पदी तर विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भूतपूर्व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक माधव सरपटवार यांची कार्याध्यक्षपदावर विशेषत्वाने निवड केली गेली. डॉ. प्रसाद खानझोडे, अशोक सोनटक्के, जयंत लिडबिडे,अमोल राजकोंडावार आणि गजानन भगत यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून पुनश्च एकदा निवड करण्यात आली.
गेल्या पाच वर्षात यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि हेमंत व्याख्यानमाला इ. प्रतिवार्षिक कार्यक्रम अशी या शाखेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी पुढील काळात देखील वर्धिष्णू राहील असा विश्वास या नवनियुक्तीनंतर अध्यक्ष दिलीप अलोणे आणि सचिव अभिजित अणे यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा: