शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल

शिबला परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास प्रशासन उत्सुक

0

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील शिबला गावाजवळ आढळलेले दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट या दगडी खांबांची यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे. या भागात आढळणारे दगड, जिवाष्म, वनस्पतींचे शासन स्तरावर जतन करण्याची तसेच शिबला भागात पर्यटन स्थळ विकसित करण्याची उत्सुकता जिल्हाधिकारी यांनी दाखवली आहे.

शुक्रवार 16 जुलै रोजी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत ऑनलाईन बैठक घेतली. निवासी जिल्हाधिकारी, भुशास्त्र विभाग अधिकारी, मानद वन्य जीव सदस्य रमजान विराणी, भूशास्त्र अभ्यासक डोळके, भूशास्त्र व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे तसेच इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत ह्यासंबंधी सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सुपरिचीत संशोधक, भूशास्त्र अभ्यासक व पर्यावरणविद प्रा. सुरेश चोपणे यांनी दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट दगडाचे संवर्धन करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. प्रा. चोपणे यांच्या मागणीची शासनाने दखल घेतल्यामुळे आदिवासी बहुल झरी तालुक्यातील घनदाट जंगलात आढळणारे दुर्मिळ जीवाष्मे, वनस्पती, पुरातन स्थळ व खनिजसंपदाचे संरक्षण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत प्रा. सुरेश चोपणे यांनी शिबला जवळ ज्या जागी करोडो वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अष्टकोणी बेसाल्ट खांब आढळले त्या जागेचे संवर्धन करण्याची मागणी केली. शिबला भागात पर्यटन क्षेत्र विकसित करणे, यवतमाळ येथे इतिहास व भोगौलिक संग्रहालय तयार करणे, जिल्ह्यातील इतरही भौगोलिक व ऐतिहासिक स्थळांचे जतन करून पर्यटन स्थळे विकसित करण्याची मागणीही प्रा. चोपणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या बैठकीत केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.