भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी सुनिल आनंदराव गारघाटे यांचा आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनांक 15 जुलै रोजी त्यांनी कोलगाव येथे त्यांच्या शेतात विष प्राषण केले होते. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. कालच कोलगाव येथे एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूच्या घटनेची शाई वाळत नाही तोच दुस-या दिवशी सुनिल यांच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचली आहे.
सुनिल आनंदराव गारघाटे हे कोलगाव येथील रहिवाशी होते. त्यांच्याकडे 5 एकर शेती होती. ते गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी शेतात गेले होते. दिवसभर त्यांनी शेतात काम केले. संध्याकाळी त्यांनी शेतातच विषारी पावडर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी घरी न आल्याने त्यांच्या कुटुबीयांनी शेतात जाऊन बघितले असता ही बाब उघडकीस आली.
सुनिल यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवसांआधी सुनिल यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आत्महत्ये मागील कारण अद्याप कळू शकले नाही. सुनिल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
सलग दोन मृत्यूने हादरले कोलगाव
सोमवारी 5 वाजता कोलगाव येथील महिला इंदूबाई मारोती हिंगाने यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला होता. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी गेले असता लोकांना सुनिल यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. सलग दोन दिवसात गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गाव हादरले असून गावात शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा:
20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?