20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?

परप्रांतिय व्यापा-यांनी फसवणूक केल्याचा सोनेगाव येथील शेतक-यांचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सोनेगाव येथील काही शेतकऱ्यांना 20 हजारांचे 2 लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून गंडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन व्यापारी पसार झाल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

परिसरात काही परप्रांतिय व्यापारी ब्लॅंकेट, चादर, कपडे व रेनकोट विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे व्यापारी परिसरातच स्थायिक असल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यात त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शेतकऱ्यांना 20 हजार द्या 15 दिवसात 2 लाख रुपये करून देतो असे आमिष दाखवले. सुरूवातीला काही शेतक-यांना त्यांनी जास्त पैसे दिल्याचे शेतकरी सांगत आहे.

सोनेगाव येथील 7 शेतक-यांना 3 व्यापा-यांनी 20 हजारांचे 2 लाख रुपये करून देतो असे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांनी त्या व्यापा-यांना पैसे दिले. 7 शेतक-यांचे एकूण 1 लाख 20 हजार रुपये या व्यापा-यांकडे जमा झाले. शेतक-यांनी 15 दिवस वाट बघितली. पुढे 4 महिने लोटल्यानंतरही पैसे मिळाले नाही. शेतक-यांनी व्यापा-यांना कॉल केला तर त्यांचा मोबाईल बंद येत आहे. ते त्यांच्या राज्यात परत गेल्याची शेतक-यांना माहिती मिळाली. 

अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकरी तुळशीराम जुमनाके यांच्यासह गजानन चंदनखेडे, किशोर क्षीरसागर, वामन कोडापे, बंडू चिकराम, सतिश मंदावार व कवडू बरडे यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून या तीन व्यापा-यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकऱणी चौकशीअंती गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.

15 दिवसांमध्ये 10 पट पैसे?
सदर शेतक-यांचा आरोप आहे की व्यापा-यांनी 15 दिवसात 10 पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र अशा गोष्टीवर शेतक-यांनी विश्वास ठेवलाच कसा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात काय जगाच्या पाठीवर कुठेही कोणतीच बँक किंवा कोणतीही स्किम 15 दिवसांमध्ये 10 पट तर सोडा दुप्पट देखील करून देत नाही. त्यामुळे हे सर्व संशयास्पद आहे. मात्र व्यापा-यांनी खरच असे आमिष दाखवून फसवणूक केली असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला बेदम मारहाण

राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार

Leave A Reply

Your email address will not be published.