बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम
वणी कायर मार्गावरील वीज खांब न काढल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या हद्दीतील जागेवर वीज वाहिन्या उभारण्यावरुन महावितरण आणि बांधकाम विभागात सध्या चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला पत्रव्यवहाराने सुरू असलेली लढाई आता कायद्याच्या मार्गावर जाण्याचे चिन्ह दिसत आहे. वणी कायर रस्त्याच्या बाजूने उभ्या केलेल्या विद्युत खांब व वाहिन्या काढण्यासाठी बांधकाम विभागाने महावितरण कंपनीला 7 दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत विद्युत खांब न हटविल्यास एफआयआर दाखल करण्याचा इशाराही महावितरणला देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार महावितरण कंपनीतर्फे साखरा (दरा) येथे 33 के.व्ही. सब स्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासाठी वणी येथून साखरा पर्यंत विद्युतीकरणचे कंत्राट पुणे येथील साईदीप इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंपनीने वणी कायर मुकुटबन या राज्यमार्ग क्र. 319 च्या मध्यापासून 7 ते 8 मीटर अंतरावर इलेक्ट्रिक पोल उभे केले आहे.
सदर रस्ता हा राज्यमार्ग असून रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतात. भविष्यात रस्ता रुंदीकरणच्या उद्देशाने ही जागा राखीव ठेवली जातात. मात्र या जागेवर महावितरण कंत्राटदारांनी कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतरीत्या विद्युतीकरणचे कार्य सुरु केले.
याबाबत सा. बा. विभाग वणी यांनी दि. 24 मे 2021 आणि 13 जुलै 2021 रोजी उप कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. झरी यांना पत्र लिहून सदर विद्युत वाहिन्या रस्त्याच्या मध्यापासून 14 ते 15 मीटर अंतरावर स्थलांतरित करण्याची सूचना केली होती. मात्र महावितरण अधिकारी व कंत्राटदारांनी बांधकाम विभागाच्या सुचनेवर अमलबजावणी केली नाही.
त्यामुळे बांधकाम विभाग वणीचे उप अभियंता यांनी दि.22 जुलै रोजी पुन्हा एक स्मरण पत्र देऊन येत्या 7 दिवसात खांब न हटविल्यास पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे. बांधकाम विभागाच्या कठोर भूमिकेनंतर महावितरण कंपनी सात दिवसात विद्युत वाहिन्या काढणार की महावितरण विरुध्द गुन्हा दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वादाला साईमंदिर ते चिखलगाव रोडवरील ‘त्या’ पोलची किनार
चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर पर्यंत रस्त्याच्या मधोमध उभे असलेले 8 विद्युत पोल काढण्यावरूनही बांधकाम विभाग व महावितरण कंपनीमध्ये वाद सुरु आहे. महावितरणने पोल स्थलांतरित करण्यासाठी बांधकाम विभागाला 67 लाख रुपये भरणा करण्याचा डिमांड पत्र दिला आहे. तर बांधकाम विभागाच्या अधिनस्थ जागेवर महा.राज्य विद्युत मंडळ (आताचे महावितरण) यांनी विना परवानगी विद्युतीकरण करण्याचे आरोप केले आहे.
खांब हटविण्याचे कंत्राटदाराला आदेश
वणी कायर मार्गावर पेटूर ते परसोडा फाटा दरम्यान बांधकाम विभागाने मार्किंग करून दिलेले विद्युत खांब व वाहिन्या हटविण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले आहे. सततच्या पावसामुळे काम बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच आम्ही कंत्राटदारांनी केलेले कार्य हॅन्डओव्हर करणार आहोत. येत्या दोन चार दिवसात खांब काढण्यात येईल.
महेश राठोड: उप कार्यकारी अभियंता, महावितरण
हे देखील वाचा: