जितेंद्र कोठारी, वणी: महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करणाऱ्या तेजापूर येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची नासधूस करण्यात आली. सोमवारी दिनांक 26 जुलै रोजी ही घटना घडली. आमलोन येथील शेतक-यांनी शेतातील पिके उद्ध्वस्थ केल्याचा पीडित शेतक-यांचा आरोप आहे. या प्रकऱणी तेजापूर येथील 32 शेतकऱ्यांनी शेजारील आमलोन गावातील 6 जणांविरुद्ध मुकुटबन पो.स्टे. मध्ये तक्रार दिली आहे. जातीय द्वेषापोटी गैरअर्जदारानी गरीब शेतकऱ्यांच्या वाहितीतील शेतात उभ्या पराठी पिकाला उपडुन पिकांची नासधूस केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.
प्राप्त माहितीनुसार मौजा अडेगाव खंड क्र. 2 मधील सर्व्हे नं. 777, 778, 779, 780, 781, 783 व 784 या ‘ई’ वर्ग जमिनीवर तेजापूर येथील आदिवासी व भूमिहीन 32 लोक अतिक्रमण करुन मागील अनेक वर्षांपासून शेती करीत आहे. अत्यंत गरीब आणि आदिवासी समाजातील हे शेतकरी अतिक्रमण केलेल्या जागेवर कापूस, सोयाबीन, तूर पिकाच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.
सदर ई वर्ग जमीन अडेगाव ग्राम पंचायतीच्या हद्दीत येत असून अडेगाव ग्राम पंचायत यांनी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांपासून अडेगाव येथील नागरिकांना काहीही त्रास नसल्याच्या दाखल दिला आहे. असे असताना सीमेवरील आमलोन गावातील काही जणांना सदर शेतकऱ्यांना चराईच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार झरीजामणी तहसील कार्यालयात केली.
तहसीलदार झरी यांनी अतिक्रमण धारक सर्व 32 शेतकऱ्यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले. नोटीसवरून सदर शेतकऱ्यांनी वकिलामार्फत 26 जुलै रोजी आपले जवाब सादर केले. त्यात वरील गट क्रमांकच्या अतिक्रमण केलेल्या जागेवर वर्ष 1988-89 पासून वाहिती करीत असल्याचे पुरावे, तलाठी अहवाल, तसेच त्या जागेवरचा कायम पट्टा मिळविणे संदर्भात सन 2008 पासून करण्यात आलेले अर्जाची प्रतही तहसीलदारांकडे सादर केली.
सदर जमीन अडेगाव ग्राम पंचायतीच्या ताब्यात असून आमलोन गावाचा या जमिनीशी काही संबंध नसल्याचा खुलासाही करण्यात आला. मात्र 26 जुलै रोजी आमलोन येथील गैरअर्जदार गणेश मिलमिले, सूर्यभान टोंगे, संदीप बुऱ्हाण, अरुण रांगणकार आणी सुनील विधाते यांनी वरील शेतकऱ्याच्या शेतात येऊन कपाशीचे झाड उपडुन फेकले तसेच झोपड्याची तोडफोड करून नुकसान केले असा तेजापूर येथील शेतक-यांचा आरोप आहे.
याबाबत तेजापूर येथील अतिक्रमणधारक शेतकरी महादेव दरवडे, कानोबा गेडाम, नत्थू गेडाम, प्रभाकर गेडाम, दिगांबर सहारे, पितांबर सहारे, खुशाल सहारे, विलास बोरकर, अनिल टेकाम, दादाजी राऊत, रामा गेडाम, सचिन शेळके चिंदू भटवलकर, संजय कडूकर, पुरुषोत्तम भोयर, शंकर नवले, बालाजी विंचू, महादेव पवार, वामन राऊत, पंडित कोल्हेकर, बंडू भोयर, सुखदेव गाताडे, अर्जुन तलांडे, नंदकिशोर बोरकर, नानाजी भोयर, विठ्ठल भोयर व इतर शेतकऱ्यांनी 27 जुलै रोजी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गैरअर्जदार 6 जणांनी जातीय द्वेषातून पिकांचे नुकसान केल्याची स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.
हे देखील वाचा: