पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे सरसावली, शुक्रवारी होणार मदतीचा ट्रक रवाना

मनसेनी केले परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. अशा संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे. अडचणीच्या या परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना बाधित कुटुंबाना मदत करण्याची सूचना केली आहे. त्या अनुषंगाने मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकाराने वणी येथून एक ट्रक भरुन जीवनावश्यक साहित्य शुक्रवार 30 जुलै रोजी कोकणच्या दिशेने रवाना होणार आहे.

मनसेतर्फे कोकणातील पूर व अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियांसाठी 1 हजार ब्लँकेट, 1 हजार साड्या, 3 हजार बिस्कीट पुडे, 3 हजार पाणी बॉटल, 5 टन तांदूळ, 1.5 टन डाळ, 1 हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य आदींचा समावेश राहणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता वणीतील शिवाजी चौकातून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना होणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणी बहुगुणीला दिली.

सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुराणे मोठे थैमान घातले आहे. या ठिकाणी शेकडो घरे पाण्याखाली गेली असून,अनेकांचा जीव गेला आहे. घरच नष्ट झाल्यामुळे येथील नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मुलभूत गरजांसाठी वणवण भटकावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसेने या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे.

मनसेनी केले मदतीचे आवाहन
मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होत आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रात आणून द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

अल्पवयीन मुलीचे वेळोवेळी बळजबरी शोषण, मुलगी गर्भवती

Leave A Reply

Your email address will not be published.